BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

देशातील बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) च्या मानधनात आयोगाकडून वाढ करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारकडून मानधन वितरित करण्यास विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने सरकारला फटकारलं.
BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार
Published on

भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधींशी शुक्रवारी (दि.२८) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल सरकारवर नाराजी व्यक्त केली. देशातील बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) च्या मानधनात आयोगाकडून वाढ करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारकडून मानधन वितरित करण्यास विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने सरकारला फटकारलं.

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत बूथ लेव्हल ऑफिसर्सना (BLO) देण्यात येणारे वाढीव मानधन अजून वितरित न झाल्याबद्दल राज्य सरकारची कडक शब्दांत खबर घेतली. बीएलओ सुपरवायझरचे मानधन १२,००० रुपयांवरून १८,००० रुपये इतके वाढवण्यात आले आहे. बीएलओंचे वार्षिक मानधन ६,००० वरून १२,००० रुपये आणि SIR प्रक्रियेसाठी मंजूर ६,००० रुपयांचे विशेष प्रोत्साहन देणारा अध्यादेश आयोगाकडून काढण्यात आला आहे. असे असले तरीही, या रकमेचे वितरण राज्याने अजूनही केले नाही, हे आश्चर्यकारक असल्याची टीका आयोगाकडून करण्यात आली.

बीएलओंचे मानधन का थांबवले?

निवडणूक आयोगाने टीएमसी प्रतिनिधींना सांगितले की, "बीएलओ व बीएलओ सुपरवायझर यांचे वाढीव मानधन जाहीर केल्यानंतर लगेच देणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारने या प्रक्रियेत कोणतीही कृती केलेली नाही."

“BLO आणि SIR साठी मंजूर अतिरिक्त मानधन राज्याने आजतागायत दिलेले नाही, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. ही रक्कम तात्काळ वितरित करणे आवश्यक आहे.” असेही आयोगाने नमूद केले.

अध्यादेश ऑगस्टचा, अंमलबजावणी अजून नाही

निवडणूक आयोगाने ऑगस्ट २०२५ स्पष्ट केले होते की, "अचूक मतदारयादी ही लोकशाहीची पायाभरणी आहे. मतदारयादी तयार करणारी यंत्रणा, ERO (इलेक्ट्रोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स), AERO (असिस्टंट इलेक्ट्रोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स), BLO सुपरवायझर्स आणि बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) हे मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतात आणि निष्पक्ष व पारदर्शक मतदारयादी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात".

१० वर्षांनी मानधनात वाढ

पुढे आयोगाने म्हटले, "आयोगाने बीएलओच्या वार्षिक मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत सहभागी बीएलओ सुपरवायझर्सचे मानधनही वाढवले आहे. याआधी अशी वाढ शेवटची २०१५ मध्ये करण्यात आली होती. तसेच ERO आणि AERO अधिकाऱ्यांना देखील प्रथमच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

"जुलै आणि ऑगस्टमध्ये केलेली अधिसूचना ही संपूर्ण देशातील सर्व बीएलओ कर्मचाऱ्यांसाठी वाढीव मानधनाची घोषणा आहे." असेही आयोगाने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in