लोणचं विसरा! झणझणीत कैरीचा ठेचा खाल तर दोन घास जास्तच जातील  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

लोणचं विसरा! झणझणीत कैरीचा ठेचा खाल तर दोन घास जास्तच जातील

उन्हाळ्यातल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी बनवा झणझणीत कैरीचा ठेचा. आंबट-तिखट चवीचा हा सोपा पदार्थ भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत एकदम भारी लागतो.

Mayuri Gawade

उन्हाळा सुरू झाला की बाजारात कैऱ्यांची रेलचेल दिसू लागते आणि घराघरांत कैरीचे विविध पदार्थ बनवले जातात. पन्हं, डाळ-कैरी, लोणचं हे नेहमीचे पर्याय असले तरी, साध्या जेवणाला झणझणीत ट्विस्ट देणारा एक भन्नाट पदार्थ म्हणजे ‘कैरीचा ठेचा’. आंबट कैरी आणि तिखट हिरव्या मिरचीचा एकत्र स्वाद इतका भारी लागतो की, ताटात हा ठेचा असला की दोन घास जास्त खाल्ले जातात.

भाकरी, पोळी किंवा अगदी साध्या वरण-भातासोबतही हा ठेचा अप्रतिम लागतो. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवायला खूप सोपा असून अगदी काही मिनिटांत तयार होतो. घरात भाजी नसेल किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली, तर कैरीचा ठेचा हा परफेक्ट पर्याय ठरतो.

साहित्य :
तेल - २ ते ३ टेबलस्पून
हिरव्या मिरच्या - ३ ते ४
लसूण पाकळ्या - ८ ते ९
जिरे - १ टेबलस्पून
हिंग - चिमूटभर
मीठ - चवीनुसार
शेंगदाणे - १ कप (भाजलेले)
कैरीचा किस - १ कप
हळद - १ टेबलस्पून
कोथिंबीर - १/२ कप

कृती :
सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, हिंग आणि मीठ घालून परतून घ्या. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घालून हे मिश्रण थोडं खमंग भाजा.

दरम्यान, कैऱ्या स्वच्छ धुऊन त्यांची सालं काढून किस करून घ्या. या किसामध्ये थोडी हळद मिसळा.

आता परतलेलं मिश्रण मिक्सरमध्ये किंवा खलबत्यात थोडं जाडसर वाटून घ्या. त्यानंतर त्यात कैरीचा किस आणि चिरलेली कोथिंबीर घालून ठेच्यासारखा जाडसर टेक्श्चर येईल असा कुटून घ्या.

खास टिप्स :

  • अधिक झणझणीत चव हवी असल्यास मिरच्यांचं प्रमाण वाढवा

  • शेंगदाणे घातल्याने ठेच्याला छान टेक्श्चर आणि चव येते

  • मिक्सरऐवजी खलबत्यात कुटल्यास पारंपरिक चव मिळते

  • ताजाच ठेचा खाल्ल्यास चव अधिक उत्तम लागते

आंबट, तिखट आणि खमंग अशा चवींचा परफेक्ट मिलाफ असलेला हा कैरीचा ठेचा उन्हाळ्यातल्या साध्या जेवणालाही खास बनवतो. एकदा करून पाहिल्यावर हा पदार्थ तुमच्या जेवणात हमखास राहील!

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?