

उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रसाळ, गोड आंबा… आणि कोकणात तर आंब्याच्या पदार्थांची खास मेजवानीच असते. याच पदार्थांपैकी एक भन्नाट चव असलेला पदार्थ म्हणजे ‘रायवळ आंब्याचं रायतं’. आंबट, गोड आणि तिखट अशा तिन्ही चवींचा सुंदर संगम असलेला हा पदार्थ जेवणाची चव दुप्पट करतो.
कोकणात लहान आकाराचे रायवळ आंबे खास या रायत्यासाठी वापरले जातात. साधी सामग्री आणि झटपट कृती, पण चव मात्र अप्रतिम!
साहित्य:
रायवळ आंबे - ५ ते ६ (किंवा गरजेनुसार)
लाल तिखट - १ टेबलस्पून
गूळ (किसलेला) - १ टेबलस्पून
मीठ - चवीनुसार
तेल - २ टेबलस्पून
मोहरी - १ टीस्पून
लसूण पाकळ्या - ५ ते ६
कृती:
सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाण्यासोबत २-३ शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची सालं काढा. आता हे आंबे एका भांड्यात घेऊन त्यावर लाल तिखट, गूळ आणि मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा, म्हणजे आंब्याला सगळे मसाले नीट लागतील.
यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि ठेचलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करा. या फोडणीत मॅरीनेट केलेले आंबे घालून २-३ मिनिटे हलके परतून घ्या. शेवटी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
खास टिप्स:
रायवळ आंबे नसतील तर लहान आंबट-गोड आंबे वापरले तरी चालतात.
गूळ कमी-जास्त करा – चवीनुसार गोडपणा adjust करा.
थोडंसं भाजलेलं जिरं पावडर घातलं तर चव अजून उठून दिसते.
जास्त शिजवू नका, नाहीतर आंबे मऊ पडतात.
गरम भाकरी, पोळी किंवा साध्या वरण-भातासोबत हे चटपटीत आंब्याचं रायतं तोंडी लावायला एकदम परफेक्ट! कोकणचा हा पारंपरिक स्वाद एकदा नक्की ट्राय करा