जेवताना ऑफस्क्रीन असणे अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण ठरते कारण ही निरोगी जीवन जगण्यासाठीची एक चांगली पद्धत आहे. हा काही नवीन ट्रेंड नाही फक्त काळानुसार याचे स्वरुप बदलले आहे. भारतीय परंपरेत जेवणाकडे खूप बारकाईने पाहिले आहे. यामध्ये केवळ भूक लागली म्हणून जेवण करणे एवढेच समाविष्ट नाही तर जेवण कसे करायला हवे याला देखील खूप महत्त्व आहे. जाणून घ्या जेवण करण्याच्या काही चांगल्या सवयींबद्दल
जेवण करण्यापूर्वी मन शांत असावे
मानवी मन चंचल आहे. आपण अन्न खात असताना सुद्धा विचार करत असतो. अशावेळी चांगले विचार मनात असणे गरजेचे आहे. कारण तसे नसल्यास नंतरच्या काळात मनावर अनेक विपरित परिणाम होतात. त्यामुळे जेवण करण्यापूर्वी मन शांत असणे गरजेचे आहे. त्यासाठीच जवळपास सर्वच धर्मांमध्ये जेवणापूर्वी प्रार्थना करण्याला महत्त्व देण्यात आले आहे. कारण त्यामुळे मन शांत होते.
आवडीचे अन्न नसेल तरी आनंदाने खावे
अनेक वेळा आपल्या जीवनात असे प्रसंग येतात की जेवण आपल्या मनासारखे नसते मात्र ते खाण्यावाचून आपल्याकडे पर्याय नसतो. परिणामी आपण असे अन्न काहीसे अरुचीने खातो. मात्र, असे करणे हे आरोग्यासाठी चांगले नसतो. याचा परिणाम अन्न चांगले पचवण्यावर होतो, असे परंपरागत तत्वज्ञान सांगते. त्यामुळे आवडीचे अन्न नसले तरी ते आनंदानेच खायला हवे.
जेवताना ऑफस्क्रीन असावे
आत्ताचे यूग हे डिजिटल यूग आहे. त्यामुळे आपल्यासाठी ऑफस्क्रीन राहणे फार अवघड होत आहे. ऑफस्क्रीन असणे म्हणजे टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्यूटर, मोबाईल, टॅब अशा कोणत्याही माध्यमावर सक्रीय न राहणे. अनेक आहारतज्ज्ञांनी यामुळे होणारे तोटे सांगितले आहेत. मुळात आपण जे अन्न खातो त्यामुळे आपले मन, मेंदू, बुद्धी कार्य करत असते. त्यामुळे जेवण करताना स्क्रीनपासून लांब राहायला हवे. आपल्या जीवनात टीव्हीचा शिरकाव झाला आणि मग टीव्ही समोर मालिका बघत जेवण्याची पद्धत रूढ झाली. यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी दाखवल्या जातात. त्याचा परिणाम अन्नावर होतो. तसेच मनावरही होतो. याशिवाय मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्यूटर स्क्रीनसमोर बसून जेवताना आपले लक्ष जेवणावर कमी असते आणि स्क्रीनवर जास्त असते. आहारतज्ज्ञांनी याचे पुढील दुष्परिणाम सांगितले आहे.
बुद्धी मंद होणे
जेवताना संपूर्ण लक्ष जेवणावर असेल तर एकाग्रता वाढते आणि बुद्धी तीक्ष्ण होते. मात्र, जेवताना स्क्रीनवर लक्ष असेल तर मनाचे विभाजन होते आणि एकाग्रता कमी होते. परिणामी आपली बुद्धी देखील मंद होते.
अतिरिक्त जेवणामुळे वजन वाढण्याचा धोका
स्क्रीनवर लक्ष असल्याने आपण गरजेपेक्षा जास्त जेवतो. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवतो.
पचनासंबंधी तक्रारी
अतिरिक्त जेवण केल्याने पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. जसे की अपचन होणे, पोट जड पडणे इत्यादी...
मानसिक आरोग्यावर परिणाम
स्क्रीनवरील नकारात्मक गोष्टी जेवण करताना पाहिल्यास त्याचे मनावर विपरित परिणाम होतात. यामुळे वेगवेगळे मानसिक आरोग्य होण्याची दाट शक्यता असते, असे विविध अभ्यासकांचे मत आहे.
निरोगी जीवन जगण्याची पद्धत
निरोगी जीवन जगण्यासाठी जेवण करताना ऑफस्क्रीन राहणे ही कधीही जीवन जगण्याची एक उत्तम पद्धत आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)