Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; 'असा' बनवा झटपट चाट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट

नेहमीच्या रताळ्याच्या चाटमध्ये उकडलेल्या रताळ्याच्या फोडींना मसाले आणि लिंबाचा रस लावला जातो. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

देवीच्या उपासनेसाठी आणि नऊ दिवसांच्या उपवासासाठी अनेकांची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीच्या काळात अनेक जण सात्त्विक आहार घेतात. या काळात नेहमीचे धान्य आणि काही मसाले टाळून साबुदाणा, राजगिरा, भगर, कुट्टूचे पीठ, बटाटा आणि रताळे यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. मात्र, उपवासाचे पदार्थ म्हटले की नेहमी तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी काहीतरी चविष्ट आणि वेगळे खाण्याची इच्छा होत असेल, तर कुरकुरीत रताळ्याची चाट नक्की करून पाहा. एअर फ्रायरमध्ये तयार होणारी ही रेसिपी चवीला आंबट, गोड आणि कुरकुरीत असल्याने उपवासाच्या मेन्यूमध्ये वेगळेपणा आणू शकते.

डिजिटल कंटेंट क्रिएटर शुभांगी हिने इन्स्टाग्रामवर रताळ्याच्या चाटची ही खास रेसिपी शेअर केली आहे. नेहमीच्या रताळ्याच्या चाटमध्ये उकडलेल्या रताळ्याच्या फोडींना मसाले आणि लिंबाचा रस लावला जातो. मात्र, या रेसिपीमध्ये रताळ्याच्या गोल चकत्या करून त्या एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत केल्या जातात. त्यावर दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि डाळिंबाचे दाणे घातले जातात. त्यामुळे प्रत्येक घासात कुरकुरीतपणा, मऊसरपणा आणि आंबट-गोड चवीचा अनुभव मिळतो.

साहित्य :

  • २ रताळी

  • १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल

  • १ छोटा चमचा सैंधव मीठ

  • १ छोटा चमचा काळी मिरी पूड

  • १ छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड

  • आवश्यकतेनुसार दही

  • हिरवी चटणी

  • चिंचेची गोड चटणी

  • सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे

कृती :

१. रताळी उकडून घ्या : सर्वप्रथम रताळी वाफवून किंवा उकडून घ्या. ती थंड झाल्यानंतर गोलाकार चकत्या कापून घ्या.

२. मसाले लावा : रताळ्याच्या चकत्या एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये ठेवा. त्यावर ऑलिव्ह ऑईल, सैंधव मीठ आणि काळी मिरी पूड शिंपडा.

३. एअर फ्रायरमध्ये शिजवा : एअर फ्रायर १८० अंश सेल्सिअस तापमानावर ठेवून रताळ्याच्या चकत्या सुमारे २० मिनिटे शिजवा. मध्ये एकदा चकत्या उलटून घ्या, जेणेकरून त्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कुरकुरीत होतील. एअर फ्रायरच्या प्रकारानुसार वेळेत थोडा फरक पडू शकतो.

४. चटण्या आणि दही घाला : रताळ्याच्या चकत्या तयार झाल्यानंतर त्या सर्व्हिंग प्लेटमध्ये मांडून घ्या. त्यावर दही, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला.

५. डाळिंब आणि जिऱ्याची पूड शिंपडा : शेवटी डाळिंबाचे दाणे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून चाट सजवा.

६. लगेच सर्व्ह करा : कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी ही चाट तयार झाल्यानंतर लगेच खावी.

नवरात्रीच्या उपवासासाठी चविष्ट पर्याय

रताळ्याचा चाट हा नेहमीच्या उपवासाच्या पदार्थांपेक्षा वेगळा पर्याय आहे. रताळ्याचा नैसर्गिक गोडवा, चटण्यांची आंबट-गोड चव आणि दह्याचा मऊसरपणा यामुळे हा पदार्थ अधिक रुचकर बनतो. एअर फ्रायरमध्ये तयार केल्यामुळे तेलाचाही मर्यादित वापर करता येतो. मात्र, उपवासात दही, चटण्या आणि वापरलेले मसाले चालतात का, हे आपल्या उपवासाच्या पद्धतीनुसार तपासून घ्यावे. सैंधव मीठ आणि उपवासासाठी योग्य साहित्य वापरल्यास ही चाट नवरात्रीच्या फराळात समाविष्ट करता येऊ शकते.

Navratri 2026 : नवरात्रीचे नऊ दिवस अन् देवीची नऊ रूपं! प्रत्येक रूपामागे दडलाय खास अर्थ, तुम्हाला माहीत आहे का?

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video