आज रामनवमी! मध्यान्ह मुहूर्तावर साजरा होणार श्रीराम जन्मोत्सव; जाणून घ्या पूजेची योग्य वेळ 
लाईफस्टाईल

आज रामनवमी! मध्यान्ह मुहूर्तावर साजरा होणार श्रीराम जन्मोत्सव; जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

आज (२६ मार्च) रामनवमी साजरी होत असून मध्यान्ह मुहूर्तावर भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. जाणून घ्या पूजेची योग्य वेळ, विधी आणि धार्मिक महत्त्व.

Mayuri Gawade

चैत्र नवरात्रीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेली रामनवमी आज (२६ मार्च) देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. भगवान श्रीरामांच्या जन्मदिनानिमित्त मंदिरे, घरे आणि विविध ठिकाणी भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

यंदा रामनवमीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये काहीसा संभ्रम होता. रामनवमीची नवमी तिथी २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी सुरू होणार असून २७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे २६ की २७ मार्च, या तारखेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, भगवान श्रीरामांचा जन्म मध्यान्ह काळात झाला असल्याने आजच्या दिवशीच रामजन्मोत्सव साजरा करणे अधिक फलदायी मानले जात आहे.

मध्यान्ह मुहूर्तावर होणार पूजन

आज रामनवमीचा मुख्य पूजन मुहूर्त सकाळी ११.१३ ते दुपारी १.४१ या वेळेत आहे. याच काळात दुपारी सुमारे १२.२५ च्या सुमारास श्रीराम जन्माचा अभिजीत क्षण मानला जातो. या वेळी मंदिरांमध्ये विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अष्टमी आणि कन्या पूजनही आजच

चैत्र नवरात्रीतील अष्टमी व्रत आणि कन्या पूजनही आजच करण्यात येत आहे. उदय तिथीनुसार सकाळी ११.४८ पर्यंत अष्टमी तिथी असल्याने या वेळेपूर्वी पूजन करणे शुभ मानले जाते.

भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

रामनवमीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये विशेष सजावट, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पालख्या, मिरवणुका आणि सामूहिक पूजा आयोजित केल्या जात असून भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहेत.

धार्मिक महत्त्व

रामनवमी हा भगवान श्रीरामांच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे. चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामांनी सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला.

हा दिवस चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाची आठवण करून देणारा मानला जातो. श्रद्धेने पूजा, नामस्मरण आणि सत्कर्म केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी धार्मिक मान्यता आहे.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल