Summer Special : आंब्याचा शिरा बनवा घरच्या घरी; गोड, सुगंधी आणि झटपट होणारी खास रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : आंब्याचा शिरा बनवा घरच्या घरी; गोड, सुगंधी आणि झटपट होणारी खास रेसिपी

रव्याचा मऊपणा, तुपाचा सुगंध आणि पिकलेल्या आंब्याचा नैसर्गिक गोडवा यामुळे हा शिरा चवीला अतिशय खास लागतो.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा म्हटलं की आंब्याचे पदार्थ घराघरांत हमखास बनवले जातात. आंब्याचा रस, आम्रखंड, मँगो मिल्कशेक यांसोबतच यंदा काहीतरी वेगळं आणि गोड बनवायचं असेल, तर आंब्याचा शिरा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रव्याचा मऊपणा, तुपाचा सुगंध आणि पिकलेल्या आंब्याचा नैसर्गिक गोडवा यामुळे हा शिरा चवीला अतिशय खास लागतो. नाश्त्यासाठी, गोड पदार्थ म्हणून किंवा पाहुण्यांसाठी झटपट बनवायचा असेल, तर आंब्याचा शिरा नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • रवा - १ कप

  • तूप - १/२ कप

  • साखर (चवीनुसार) - ३/४ ते १ कप

  • पिकलेल्या आंब्याचा गर - १ कप

  • दूध - १ कप

  • गरम पाणी - १.५ कप

फ्लेव्हर आणि गार्निशसाठी :

  • वेलची पूड - १/२ छोटा चमचा

  • काजू - १० ते १२

  • बदाम - ८ ते १० (कापलेले)

  • थोडे केशर (ऐच्छिक)

कृती :

१. रवा भाजून घ्या

सर्वप्रथम कढईत तूप गरम करा. त्यात काजू आणि बदाम हलके सोनेरी होईपर्यंत परतून वेगळे काढून ठेवा. त्याच तुपात रवा घालून मंद आचेवर हलक्या सोनेरी रंगाचा आणि सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्या.

२. दूध-पाण्याचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात दूध आणि गरम पाणी एकत्र करून घ्या. हे मिश्रण हळूहळू भाजलेल्या रव्यामध्ये घाला. गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत हलवत राहा.

३. आंब्याचा गर घाला

रवा फुलू लागला की त्यात आंब्याचा गर घाला. आंब्याचा गर घातल्यानंतर मिश्रणाला छान पिवळा रंग आणि नैसर्गिक गोडवा येतो. हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्या.

४. साखर आणि वेलची पूड मिसळा

यानंतर साखर, वेलची पूड आणि केशर घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करा. साखर वितळल्यानंतर शिरा थोडा सैल होईल, पण काही मिनिटांत पुन्हा घट्ट होईल.

५. सजवून सर्व्ह करा

शिरा छान मऊसर आणि सुगंधी झाला की गॅस बंद करा. वरून भाजलेले काजू-बदाम घालून गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • शिऱ्यासाठी हापूस किंवा केसर आंब्याचा गर वापरल्यास चव अधिक छान लागते.

  • आंबा गोड असेल तर साखर कमी वापरा.

  • शिरा अधिक रिच आणि क्रीमी हवा असेल, तर थोडे अधिक दूध घालू शकता.

  • केशर घातल्यास शिराला छान रंग आणि हलका शाही फ्लेवर येतो.

  • हा शिरा गरम आणि थंड दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागतो.

आंब्याचा शिरा हा झटपट तयार होणारा, सुगंधी आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. रोजच्या गोडधोडात थोडा बदल हवा असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

उल्हासनगरच्या वाहतूककोंडीवर उतारा? उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र वेंगुर्ल्यात

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ लावल्यास १००० रु. दंड; थेट तुरूंगवासही, दक्षिण रेल्वेचा नवा नियम

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही