- भवताल
- उमेश झिरपे
ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना २०२३ चा ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार’ अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला. त्यानिमित्त मुंबईतील सर्व गिर्यारोहक संस्था आणि गिर्यारोहक यांनी एकत्रितपणे त्यांच्या कार्याचा गौरव करणारा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यानिमित्त उमेश झिरपे यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत.
अहो झिरपे काका, आईविना लहान मुलाला कशाला डोंगरदऱ्यांमध्ये पाठवताय?’ हे वाक्य माझ्या वडिलांना, म्हणजेच म. ग. झिरपे यांना, माझ्या बालपणी कित्येक वेळा ऐकावे लागले. पण माझं सुदैव असं की, त्यांनी अशा सल्ल्यांकडे कायमच दुर्लक्ष केलं. उलट, त्यांच्या उत्साहाने, त्यांच्या पाठबळाने मला सातत्याने भटकंतीसाठी निसर्गाच्या सहवासात जायला मिळाले. हाच माझ्या आयुष्याचा पाया ठरला आणि याच भटकंतीमधून माझं आयुष्य गिर्यारोहणाकडे वळलं.
माझ्या गिर्यारोहण प्रवासाची सुरुवात पुण्यातील महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया प्रशालेमध्ये झाली. मुख्याध्यापक दिवंगत आपटे सर, घाणेकर सर व विश्वास केळकर सर यांनी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये ‘गिर्यारोहणा’ची बीजं पेरण्याचं काम केलं. गिर्यारोहणाचा पहिला धडा मला व माझ्या इतर दहा विद्यार्थी मित्रांना १९७८ साली मिळाला. त्यावर्षी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ ट्रेकचं आयोजन केलं होतं. सुमारे १०० किलोमीटरचं पदभ्रमण आणि १४,००० फूट उंचीपर्यंतची चढाई... या अनुभवाने माझ्या हिमालयातील भटकंतीचा श्रीगणेशा झाला. त्या यशस्वी ट्रेकनंतर आत्मविश्वास वाढला आणि गिर्यारोहणाची ओढ आयुष्यात वेगळं वळण घेत गेली.
पुढे अनेक वर्षं सह्याद्रीच्या कुशीत भटकंती, चढाई, बोटांनी खडकांची भाषा शिकणं, हवामानातल्या बदलांची नोंद ठेवणं, अशा असंख्य गोष्टी करत करत गिर्यारोहण माझ्या जीवनशैलीचाच भाग बनलं. गिर्यारोहण ही केवळ शारीरिक चढाई नाही, तर ते एक मनाला, विचारांना आणि जीवनाला आकार देणारं साधन आहे, ही जाणीव काळानुसार अधिक खोलवर होत गेली.
हळूहळू सह्याद्रीतल्या कातळकड्यांवरून माझा प्रवास हिमालयात पोहोचला. लडाख, उत्तर काशी, गढवाल, कुमाऊँ, सिक्कीम या प्रत्येक भागात निरनिराळी आव्हानं, निसर्गाचे विविध रंग अनुभवता आले. पण खरी कसोटी लागली ती ८००० मीटरपेक्षा उंच शिखरांच्या मोहिमा सुरू झाल्यावर.
८००० मीटर म्हणजे मृत्यूची सावली पाठीवर घेऊन चालावं लागतं. हवेत ऑक्सिजनचं प्रमाण अत्यल्प, थंडी, वादळी वारे आणि त्याहून मोठं म्हणजे मानसिक द्वंद्व. मात्र या सगळ्या प्रतिकूलतेतून पार होत गिरिप्रेमींच्या टीमसोबत मी ८००० मीटरच्या अनेक मोहिमा केल्या. माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, कांचनजुंगा, धौलागिरी, च्योओयू, मकालू, मनासलू, अन्नपूर्णा या शिखरांवर टीमने यशस्वी चढाई केली. या सर्व मोहिमांचे नेतृत्व करण्याची संधी मला लाभली, हे माझं भाग्य.
या मोहिमा म्हणजे फक्त यशाच्या शिखरावर झेंडा लावणं नव्हतं, तर माणूस म्हणून स्वतःला ओळखण्याचा प्रवास होता. अनेकदा चढाई अर्धवट सोडावी लागली, काही वेळा अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे परत फिरावं लागलं आणि काही मोहिमा मृत्यूच्या सीमारेषेवर जाऊन पार पाडाव्या लागल्या. पण प्रत्येकवेळी अनुभव समृद्ध करत गेला. या सर्व प्रवासात ‘गिरिप्रेमी’ ही संस्था माझ्यासाठी एका कुटुंबासारखी होती. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली ही संस्था हळूहळू हिमालयातल्या शिखरांवर पोहोचली आणि देशातील अग्रगण्य गिर्यारोहण संघटनांपैकी एक बनली.
२०१५ साली गिरिप्रेमीचं अपत्य जन्माला आलं असं मी म्हणेन. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग’ (Guardian Giripremi Institute of Mountaineering) म्हणजेच जीजीआयएम - GGIM ची स्थापना झाली. माझं स्वप्न होतं की, गिर्यारोहण व साहसी खेळांमध्ये आपसूकच भिनलेली शिस्त फक्त मोहिमांपुरती न राहता, ती जीवनशैली बनावी. जीजीआयएमच्या माध्यमातून आम्ही हजारो विद्यार्थ्यांपर्यंत गिर्यारोहणाचं प्रशिक्षण पोहोचवलं. यामध्ये केवळ डोंगर चढणं शिकवलं नाही, तर आत्मविश्वास, सहकार्य, नेतृत्वगुण, संयम आणि निसर्गाविषयी कृतज्ञता यांचाही वारसा दिला.
जीजीआयएमचे कार्यक्रम केवळ साहसी नसून सामाजिकतेचा आधार असलेले आहेत. ‘आव्हान’, ‘निर्माण’, ‘उडान’ हे जीजीआयएमचे शैक्षणिक उपक्रम मुलांना निर्णयक्षमतेपासून टीमवर्कपर्यंत अनेक जीवनगुण शिकवतात. या उपक्रमांमध्ये आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आम्ही सहभागी करून घेतलं, त्यांना एक व्यासपीठ मिळवून दिलं.
गिर्यारोहणाच्या अनुभवांना समोर ठेवून मी काही पुस्तकंही लिहिली. एव्हरेस्ट, कांचनजुंगा मोहिमांवरील पुस्तकांतून गिर्यारोहण मोहीम कशी उभी राहते व कशी पार पडते याचा इतिवृत्तांत दिला. ‘पर्वतपुत्र शेर्पा’च्या माध्यमातून मला डोंगरात भेटलेल्या ‘डोंगर भाऊं’च्या यशोगाथा मांडता आल्या. ‘हिमालयातील दिवस’सारख्या पुस्तकांतून हिमालयाचा जीवनप्रवास उलगडता आला. ही पुस्तकं म्हणजे माझ्या अनुभवांचा प्रामाणिक दस्तावेज आहेत, असं मला वाटतं. या पुस्तकांतून कुणी प्रेरणा घेतं व आपल्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी पुन्हा जोमाने उभं राहतं हे जेव्हा मला कळतं, तेव्हा वाटणारं समाधान खरंच शब्दातीत आहे. माझ्या दृष्टीने हीच आपल्या कामाची पावती.
जसा लोकाश्रय तुम्हाला समाधान देतो, तसं राजाश्रय तुमच्यावरील जबाबदारी वाढवतं. राज्य सरकारने दिलेला ‘श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार’ असो वा केंद्र शासनाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (जीवनगौरव)’ असो, हे मी माझ्या टीमच्या, संस्थेच्या वतीने स्वीकारले आहेत. मला वाटतं की, मी फक्त निमित्तमात्र आहे. पण या पुरस्कारांपेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी म्हणते की, “मामा, तुम्ही प्रेरणा दिली, म्हणून मी आज हिमालयात पोहोचलोय”, त्या क्षणी मिळालेला आनंद हा सर्वोच्च असतो.
आज वयाच्या साठीनंतरही मी डोंगरांकडे तेवढ्याच प्रेमाने आणि आदराने पाहतो. गिर्यारोहणाने मला केवळ यश नाही दिलं, तर एक जीवनदृष्टी दिली. संकटात धैर्याने उभं राहायचं, अपयश आलं तरी हार मानायची नाही आणि संघात राहून पुढे जायचं- हे सगळं गिर्यारोहणाने शिकवलं.
माझा ठाम विश्वास आहे की, प्रत्येकाने आपल्या जीवनात गिर्यारोहणाचे गुण आत्मसात करावेत. पर्वत चढायचे नसले, तरी आयुष्यातल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘गिर्यारोहक’वृत्ती आवश्यक आहे. कारण डोंगर आपल्याला खूप काही शिकवत असतो - स्थैर्य, संयम, नम्रता आणि जिद्द.
आज मागे वळून पाहतो, तेव्हा जाणवतं की ‘सह्याद्रीत घडलो, हिमालयात बहरलो’ ही माझ्या आयुष्याची खरी ओळख आहे. म्हणूनच या प्रवासात सोबत दिलेल्या सर्व सहप्रवासी, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो.
डोंगर अजूनही हाक मारतात आणि मी अजूनही त्या हाकेला ओ देतो - कारण गिर्यारोहण हे माझ्यासाठी साहसी खेळाच्या पलीकडे आहे, ती माझी जीवनशैली आहे.
ज्येष्ठ गिर्यारोहक, गिरिप्रेमी
umzirpe@gmail.com