आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स  
लाईफस्टाईल

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

मोबाईल नंबर गोपनीय ठेवूनही WhatsApp वर संवाद साधण्याचा मार्ग आता खुला होणार आहे. कंपनी लवकरच Username फीचर आणत असून, त्याच्या मदतीने नंबर शेअर न करताही नवीन व्यक्तींशी संपर्क साधता येणार आहे.

Mayuri Gawade

व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी एक महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर घेऊन येत आहे. लवकरच Username फीचर उपलब्ध होणार असून, त्याच्या मदतीने मोबाईल नंबर शेअर न करता इतरांशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे विशेषतः अनोळखी व्यक्ती, ग्रुप किंवा कम्युनिटीशी संपर्क साधताना वैयक्तिक नंबर सुरक्षित ठेवणं अधिक सोपं होणार आहे.

आतापर्यंत व्हॉट्सॲपवर नवीन व्यक्तीशी संवाद सुरू करण्यासाठी मोबाईल नंबरची देवाणघेवाण करावी लागत होती. मात्र, नव्या फीचरनंतर प्रत्येक वापरकर्ता स्वतःसाठी एक युनिक यूझरनेम तयार करू शकणार आहे. समोरच्या व्यक्तीकडे तो यूझरनेम असल्यास, मोबाईल नंबर न पाहताही संवाद साधता येईल.

नव्या फीचरमुळे वाढणार सुरक्षितता

व्हॉट्सॲपनुसार, या फीचरमध्ये कोणतीही सार्वजनिक सर्च लिस्ट किंवा डिरेक्टरी असणार नाही. म्हणजेच, केवळ यूझरनेम तयार केल्याने कोणीही तो सहज शोधू शकणार नाही. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे तुमचं अचूक यूझरनेम असणं आवश्यक असेल. त्यामुळे प्रायव्हसी अधिक सुरक्षित राहील.

'Username Key' देणार अतिरिक्त सुरक्षा

या फीचरसोबत Username Key हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा पर्याय सुरू केल्यास, नवीन व्यक्तीला संदेश पाठवण्यासाठी अतिरिक्त पडताळणीची गरज भासेल. यामुळे स्पॅम मेसेज आणि अनोळखी व्यक्तींकडून होणारा अनावश्यक संपर्क कमी होण्यास मदत होईल.

क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठीही उपयुक्त

कंटेंट क्रिएटर्स, व्यावसायिक आणि विविध संस्थांसाठीही हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. अशा वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवरील उपलब्ध यूझरनेम व्हॉट्सॲपवरही वापरण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर एकसारखी ओळख राखणं सोपं होईल.

यूझरनेम कसं तयार कराल?

हे फीचर उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सॲपच्या Settings > Account > Username या पर्यायामध्ये जाऊन यूझरनेम तयार किंवा रिझर्व्ह करता येईल. पसंतीचं यूझरनेम आधीच वापरलं जात असल्यास, WhatsApp कडून पर्यायी यूझरनेम सुचवले जातील. सध्या ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात असून, येत्या काही महिन्यांत ती जगभरातील वापरकर्त्यांसाठी सुरू होणार आहे. फीचर उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सॲपकडून ॲपमध्येच सूचना दिली जाईल.

नव्या Username फीचरमुळे व्हॉट्सॲपवरील प्रायव्हसी आणखी मजबूत होणार असून, मोबाईल नंबर गोपनीय ठेवत सुरक्षितपणे संवाद साधण्याचा पर्याय वापरकर्त्यांना मिळणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल

Mumbai : मीरा-भाईंंदरकरांनो, पाणी जपून वापरा; १ जुलैपासून २४ ते ४८ तास पाणी पुरवठा बंद

मोहरम मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध नाही; मुंबई पोलिसांचा खुलासा

विसर्जित पीओपी मूर्तींपासून ७६० स्टडी टेबल तयार; नवी मुंबई महापालिकेचा अनोखा पर्यावरणपूरक प्रयोग

लेखी आदेशाशिवाय नवीन काम स्वीकारू नका! मोटरलोडर कामगारांना कामगार सेनेचे आवाहन