Winter Fashion Tips : हिवाळ्यात फक्त स्वेटर आणि जॅकेटच नको, स्टायलिश दिसण्यासाठी वॉर्डरोबमध्ये ठेवा 'हे' ५ ट्रेंडी कपडे 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Winter Fashion Tips : हिवाळ्यात फक्त स्वेटर आणि जॅकेटच नको, स्टायलिश दिसण्यासाठी वॉर्डरोबमध्ये ठेवा 'हे' ५ ट्रेंडी कपडे

Winter Fashion: यंदाच्या हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासोबतच स्टायलिश दिसायचंय? जाणून घ्या ५ ट्रेंडी फॅशन पर्याय.

Mayuri Gawade

हिवाळा सुरू झाला की कपाटातून स्वेटर, जॅकेट, मफलर आणि उबदार कपडे बाहेर काढले जातात. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण अनेकदा तेच जुने स्वेटर आणि जीन्स वापरतो. पण यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला तुमच्या लूकमध्ये थोडा बदल करायचा असेल, तर काही नवीन फॅशन ट्रेंड नक्कीच उपयोगी पडू शकतात. विशेष म्हणजे स्टायलिश दिसण्यासाठी भरपूर नवीन कपडे खरेदी करण्याचीही गरज नाही. काही निवडक कपडे तुमच्या जुन्या कपड्यांसोबत घालून तुम्ही आकर्षक लूक मिळवू शकता.

सध्या क्रॉप्ड लेदर जॅकेट, स्कार्फ असलेले स्वेटर, बॉम्बर जॅकेट, मिनी स्कर्ट आणि वुलन ट्राउझर्स असे पर्याय हिवाळ्यातील फॅशनसाठी चर्चेत आहेत. हे कपडे वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करता येतात. त्यामुळे कॉलेज, ऑफिस किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाताना तुमचा लूक अधिक उठावदार दिसू शकतो. जाणून घेऊया हिवाळ्यातील फॅशनचे हे ५ खास पर्याय.

१. क्रॉप्ड लेदर जॅकेट

हिवाळ्यात लेदर जॅकेट घालण्याची फॅशन नवीन नाही. मात्र, यंदा कंबरेपर्यंत लांबी असलेल्या क्रॉप्ड लेदर जॅकेटचा पर्याय निवडता येईल. हे जॅकेट नेहमीच्या जॅकेटपेक्षा थोडं वेगळं आणि अधिक स्टायलिश दिसतं. काळ्या किंवा चॉकलेटी रंगाचं क्रॉप्ड लेदर जॅकेट अनेक कपड्यांवर सहज शोभून दिसू शकतं. तुम्ही ते वाइड लेग जीन्स, फिटेड टॉप, ड्रेस किंवा मिनी स्कर्टसोबत घालू शकता. साध्या कपड्यांनाही या जॅकेटमुळे आकर्षक लूक मिळतो.

२. स्कार्फ असलेले स्वेटर

थंडीत स्वेटरसोबत मफलर किंवा स्कार्फ घालावा लागतो. पण अनेकदा स्वेटर आणि स्कार्फचे रंग जुळवताना गोंधळ होतो. यावर स्कार्फ जोडलेले स्वेटर हा चांगला पर्याय ठरू शकतो. या स्वेटरला स्कार्फसारखा भाग आधीपासूनच जोडलेला असतो. त्यामुळे वेगळा स्कार्फ घेण्याची गरज पडत नाही. अशा स्वेटरसोबत जीन्स, ट्राउझर्स किंवा लांब स्कर्ट घालता येतो. राखाडी, क्रीम, बेज आणि चॉकलेटी रंगाचे स्वेटर निवडल्यास ते इतर कपड्यांसोबतही सहज जुळवता येतात.

३. बॉम्बर जॅकेट

तुम्हाला कॅज्युअल आणि थोडा स्पोर्टी लूक आवडत असेल, तर बॉम्बर जॅकेट नक्की ट्राय करू शकता. हे जॅकेट थोडं सैलसर असतं आणि त्यामुळे आरामदायीही वाटतं. साधा टी-शर्ट आणि जीन्सवर बॉम्बर जॅकेट घातलं तरी छान लूक मिळतो. याशिवाय फिटेड टॉप किंवा ट्राउझर्ससोबतही ते घालता येतं. कॉलेजला जाणाऱ्या तरुणींसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. नेहमीच्या डेनिम किंवा पफर जॅकेटपेक्षा काहीतरी वेगळं वापरायचं असेल, तर बॉम्बर जॅकेटचा विचार करू शकता.

४. मिनी स्कर्ट आणि लेग वॉर्मर्स

हिवाळ्यातही थोडा हटके आणि ग्लॅमरस लूक हवा असेल, तर मिनी स्कर्टसोबत लेग वॉर्मर्स घालण्याचा पर्याय निवडता येईल. लेग वॉर्मर्स म्हणजे पायांना उब देण्यासाठी वापरले जाणारे लोकरीचे कव्हर. मिनी स्कर्टवर ओव्हरसाइज स्वेटर किंवा फिटेड टर्टलनेक टॉप घालता येतो. त्यासोबत लेग वॉर्मर्स आणि बूट्स घातल्यास संपूर्ण लूक आकर्षक दिसतो. हा फॅशन ट्रेंड पाहून 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील करिनाच्या 'पू' या पात्राची आठवण येऊ शकते. अधिक थंडी असल्यास स्कर्टसोबत जाड स्टॉकिंग्जही वापरता येतात.

५. वुलन ट्राउझर्स

हिवाळ्यात रोज जीन्स किंवा लेगिंग्ज घालण्याचा कंटाळा आला असेल, तर वुलन ट्राउझर्स हा चांगला पर्याय आहे. लोकरीच्या किंवा उबदार कापडाच्या या पँट्स आरामदायी असण्यासोबतच स्टायलिशही दिसतात. विशेषतः वाइड लेग आणि स्ट्रेट फिट ट्राउझर्सचा पर्याय निवडता येईल. काळा, राखाडी, बेज आणि चॉकलेटी रंगाच्या ट्राउझर्सवर साधा स्वेटर, फिटेड टॉप किंवा लेदर जॅकेट छान दिसू शकतं. ऑफिसमध्ये जाताना किंवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर पडताना या पँट्स वापरता येतात.

कमी कपड्यांतही मिळवा स्टायलिश लूक

हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन कपडे खरेदी करण्याची गरज नसते. तुमच्याकडे आधीपासून असलेल्या जीन्स, स्वेटर, टॉप किंवा स्कर्टसोबत एखादं नवीन जॅकेट किंवा ट्राउझर्स वापरूनही वेगळा लूक तयार करता येतो. कपडे निवडताना रंगसंगती, आरामदायी फिटिंग आणि थंडीपासून मिळणारं संरक्षण या गोष्टींचाही विचार करा. योग्य पद्धतीने कपड्यांची निवड केल्यास हिवाळ्यात उबदार राहण्यासोबतच तुमचा फॅशन अंदाजही खास ठरू शकतो.

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

नवस पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या मूर्तीखालून रांगत गेला; पण पुढे घडलं असं काही की मदतीसाठी धावले भाविक, Video व्हायरल