विषारी दारूचे १७ बळी; पुणे-पिंपरीत हाहाकार, ८ जणांना अटक 
महाराष्ट्र

विषारी दारूचे १७ बळी; पुणे-पिंपरीत हाहाकार, ८ जणांना अटक

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांत हातभट्टीची विषारी स्पिरिटयुक्त दारू प्यायल्याने शुक्रवार संध्याकाळपर्यंत १७ नागरिकांना जीव गमवावा लागला.

Swapnil S

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांत हातभट्टीची विषारी स्पिरिटयुक्त दारू प्यायल्याने शुक्रवार संध्याकाळपर्यंत १७ नागरिकांना जीव गमवावा लागला. अनेकांची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या भयंकर घटनेमुळे दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरात खळबळ उडाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि अड्ड्याचे मालक कर्नलसिंह विरखा यांच्यासह एकूण ८ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दापोडी पोलिसांनी अटक केलेल्या ४ मुख्य आरोपींचा समावेश आहे.

या प्रकरणी त्वरित कारवाई करून अटक केलेल्यांमध्ये कर्नलसिंह तखतसिंह विरका (वय ७३), गुरमंगतसिंह कर्नलसिंह विरका (वय ४५, दोघे रा. संजयनगर, फुगेवाडी), योगेश रामचंद्र व्हानकडे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) आणि राधेश्याम हरिराम प्रजापती (वय ३५, रा. उरुळीकांचन) यांचा समावेश आहे असे सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांनी सांगितले.

आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने समांतर कारवाई करून आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी, दयानंद राजपूत आणि आर्यन संजय धोत्रे या अन्य चार जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गुन्हा करण्याच्या उद्देशाने अपायकारक पदार्थाद्वारे इजा करणे, इतरांचे जीव धोक्यात आणणारी कृती, अपायकारक पेयाची विक्री आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनेक महिन्यांपासून अवैध दारूचा अड्डा

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील दापोडी परिसरातील संजय नगर येथे विरका सिंग कुटुंबीयांकडून मागील अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्रीचा अड्डा चालवला जात होता. आरोपी योगेश वानखेडे हा या कुटुंबाला अवैध दारूचा पुरवठा करत असे आणि त्यानंतर ही दारू ग्राहकांना विकली जात होती. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात सुरुवातीला १० जणांचा मृत्यू झाला, तर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात ७ जणांनी आपला जीव गमावला आहे.

दोन सख्खे भाऊ व भाच्याचा मृत्यू

या विषारी दारूच्या सेवनामुळे मृत झालेल्यांमध्ये फुगेवाडीतील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी, भीमाप्पा बसवंत पुजारी, पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजेंद्र राजपूत, अकबर पठाण, काशिनाथ निकाळजे आणि आनंद देसाई यांचा समावेश आहे. हडपसर परिसरातील पांढरे मळा आणि ससाणे नगर भागात राहुल शरद क्षीरसागर, विजय भूकुरलाल शर्मा, अरुण डाडर आणि अशोक रमेश चव्हाण यांचा बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे हडपसरमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या बहिणीच्या मुलाचाही या विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वस्तीच्या मधोमध अवैध दारूचे गुत्ते राजरोसपणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती, तरीही कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. काही स्थानिकांनी तर पोलीस हप्ता घेत असल्यामुळेच हे धंदे सुरू असल्याचा दावा केला असून, वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले आहे.

दोषींवर कठोर शासनाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन अवैध दारू निर्मिती आणि पुरवठा साखळीत सामील असलेल्या प्रत्येकाला शोधून कडक शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मानवी जीव वाचवणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रुग्णालयात दाखल असलेल्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सध्या मृतांच्या शवविच्छेदनाचा आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल येणे बाकी असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त संदीप अटोले आणि जीवन बेनीवाल यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी फोडला काऊंटर

ज्या दारु अडड्यामुळे ही दुर्देवी घटना घडली, तिथे रोहित पवार स्वत: पोहोचले व त्यांनी काऊंटर फोडला. रोहित पवारांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दारु अड्डा फोडून टाकला. तिथे लावलेले पत्रे उखडले. “जेव्हा सिस्टिम काम करत नाही, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, तेव्हा आम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे, काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो, सिस्टिम मदत करत नाही, अजितदादांच्या बाबतीत सिस्टिम मदत करत नाही” असे रोहित पवार म्हणाले.

धर्म बघून बुलडोझर चालवला जातो...

‘दारु पिऊन गरीबाची माणसे मरतात. सिस्टिम काहीही करत नाही. त्यावेळी लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो. कार्यकर्त्यांनी दारु अड्ड्यांची तोडफोड केली आहे. बुलडोझर धर्म बघून चालवला जातो. सामान्य लोकांचा जीव जातो, तेव्हा प्रशासन शांत बसतं” अशा शब्दात रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. त्याआधी ते ससून रुग्णालयात गेले व विषारी दारुमुळे अडचणीत असलेल्या पीडित कुटुंबांची भेट घेतली. पोलिसांना विचारल्यावर सांगतात, अजून कारण कळलेलं नाही. पोलीस कोणाचीतरी पाठ राखण करण्याचा प्रयत्न करतात. एक जण स्वतहून ताब्यात येतो. पुढचा तपास होऊ नये यासाठी हे सगळं चाललं आहे.

पोलिसांनीच एकाला सरेंडर व्हायला सांगितलं. म्हणजे तपास होणार नाही, मोठा मासा यातून सुटेल” असा आरोप रोहित पवार यांनी केला.

अनेक संसार उघड्यावर

केवळ राठोड कुटुंबच नाही, तर चाळीशीच्या आतील कित्येक तरुणांचे संसार या विषारी दारूने उघड्यावर आणले आहेत. ४२ वर्षीय अकबर पठाण, जे कुशल इलेक्ट्रिशियन म्हणून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते, त्यांच्या निधनाने संपूर्ण मोहल्ला सुन्न झाला आहे. ईदच्या दिवशी ज्या घरात आनंदाची लगबग असायची, तिथून आज अंत्ययात्रा निघत होती. कुटुंबातील सदस्यांनी आमच्या घरचा चांदच हरवला, असा आक्रोश केला. त्यांच्या सोबतीला सुतारकाम करून घर सांभाळणारे ४४ वर्षीय बाबा शेख यांच्या निधनाने सुतारकाम करणाऱ्या कुटुंबाचा आधार कोसळला आहे. एकाच भागात राहणारे, सोबत जगणारे जीवाभावाचे मित्र आज मृत्यूच्या दारातही सोबतच गेले.

मुंबईहून इथेनॉल आणून बनविली दारू

ज्या नागरिकांनी या विषारी दारूचे सेवन केले, त्यांना मळमळणे, पोटदुखी, तीव्र चक्कर येणे आणि उलट्या होण्यासारखी लक्षणे दिसून आली. अनेकांच्या तोंडाला फेस आला आणि ते जागीच कोसळले, तर काहींचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने मुंबईवरून विनापरवाना इथेनॉल आणून त्यापासून ही दारू बनवली होती आणि ती दापोडी, हडपसर व चतुश्रुंगी परिसरातील वेगवेगळ्या विक्रेत्यांना विकली होती. या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी केली असून संशयित दारूचे कॅन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मराठा समाजाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका; जरांगेंचा हल्लाबोल, आजपासून उपोषण

पेपरफुटी हा तर राष्ट्रद्रोही कट

आजचे राशिभविष्य, ३० मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ebola Virus Alert : इबोला व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला