Mumbai : पोलिसाकडून महिला आंदोलकाचा विनयभंग? विरोधकांकडून निलंबनाची मागणी; व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

व्हिडिओमध्ये साध्या वेशातील एक पोलिस कर्मचारी आंदोलकांच्या दिशेने धावत जातो. गोंधळाच्या परिस्थितीत तो एका महिला आंदोलकाला पकडून...
Mumbai : पोलिसाकडून महिला आंदोलकाचा विनयभंग? विरोधकांकडून निलंबनाची मागणी; व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
Mumbai : पोलिसाकडून महिला आंदोलकाचा विनयभंग? विरोधकांकडून निलंबनाची मागणी; व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
Published on

मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकाचा पोलिस कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेवरून विरोधकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली असून, मुंबई पोलिसांनी मात्र हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा केला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

दादर परिसरातील आंदोलनादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये साध्या वेशातील एक पोलिस कर्मचारी आंदोलकांच्या दिशेने धावत जातो. गोंधळाच्या परिस्थितीत तो एका महिला आंदोलकाला पकडून ओढताना दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

वर्षा गायकवाड यांचा संताप

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली. "एका महिला आंदोलकाला पुरुष पोलिस कर्मचाऱ्याने अशा पद्धतीने का हाताळले? महिला पोलिसांकडून ही कारवाई का करण्यात आली नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत त्यांनी ही घटना अस्वीकार्य असल्याचे म्हटले.

मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

या आरोपांवर मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी प्रत्यक्षात एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी महिला आंदोलक मध्ये आल्यामुळे हा प्रकार घडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओची पडताळणी केली असून, संबंधित कर्मचाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन झाल्याचे आढळले नसल्याचा दावा पोलिसांनी केला.

विरोधकांकडून पोलिसांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका केली. संबंधित अधिकारी महिलेला पकडल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांनी तिला का सोडले नाही, असा सवाल करत पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण त्यांनी फेटाळले.

दोन दिवसांत दुसरी वादग्रस्त घटना

गेल्या दोन दिवसांत मुंबई पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही दुसरी घटना आहे.

याआधी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना बनावट अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in