मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे गुंडासोबत असलेले फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, सध्या जामिनावर बाहेर असलेला गुंड निलेश घायवाळ याचे मंत्रालयाच्या आवारातील रील व्हायरल होत आहे. यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांना टीका करायला आयते कोलीत मिळाले आहे. राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ(रील) ट्विट केला आहे. त्यात गुंड निलेश घायवाळ याच्यासह काहीजण मंत्रालय आवारात दिसत आहेत. "गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती "मोदी की गॅरंटी" ?", असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
तर, वडेट्टीवार यांनी आणखी एका ट्विटमध्ये काही फोटो कोलाज करुन पोस्ट केले आहेत. यात गुंड निलेश घायवाळ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य़ासोबत दिसत आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीसोबत दिसत आहेत. एका फोटोत श्रीकांत शिंदे हे हेमंत दाभेकरसोबत दिसत आहेत. यावरुन वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
"निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात! निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गैंग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा. मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट. मुख्यमंत्र्यांची निलेश घायवाळ सोबत भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीशी भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारणेशी घरी जाऊन भेट", असे म्हणत गुंडांचे आदरतिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी?, असा सवाल वडेट्टीवार केला आहे.