@RRPSpeaks
महाराष्ट्र

बारामती अॅग्रोवर कारवाई! रोहित पवार म्हणाले....

राज्य सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडून रात्री दोन वाजता 72 तासामध्ये बारामती अॅग्रोचा प्लांट बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. बारामती अॅग्रो 72 तासात बंद करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण विभागाने (Maharashtra Pollution Control Board) आमदार रोहित पवार यांना दिले आहेत. बारामती अॅग्रो (Baramati Agro) कंपनीवर बुधवारी मध्यरात्री दोन वाजता प्रदूषण विभागाने धाड टाकत ही कारवाई केली आहे. बारामती अॅग्रोवर झालेल्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली असून चर्चा सुरु झाल्या आहेत.

रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडून रात्री दोन वाजता 72 तासामध्ये बारामती अॅग्रोचा प्लांट बंद करण्याची नोटीस देण्यात आली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. ही कारवाई दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. राजकीय सूडबुद्धी मुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले.

राज्यातील शिंदे फडणवीस आणि अजितदादा गटावर त्याच बरोबर राज्य सरकारवर आमदार रोहित पवार हे सातत्याने टीका करत असतात. विशेषता बंडखोरी करून बाहेर पडलेले अजित दादा पवार यांच्यासह त्यांच्या गटातील इतर नेते आणि मंत्र्यांवर देखील रोहित पवार हे सातत्याने टीका करत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की मी आधी व्यवसायात होतो. नंतर राजकारणात आलो परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच रिटर्न गिफ्ट देईल ही खात्री आहे. असं ते म्हणाले. तसंच सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन् महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील. असं मत रोहित पवार यांनी मांडलं आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?