महाराष्ट्र

आषाढी यात्रेनिमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज! सोयी-सुविधांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी

Swapnil S

पंढरपूर : संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि.१७ जुलै रोजी आषाढी यात्रा भरत असून येणाऱ्या लाखो भाविक, वारकऱ्यांना प्रशासनाच्यावतीने चांगल्या दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का? स्वच्छता ठेवण्यात आली आहे का व वारकऱ्यांना शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी हँडवॉशची ही सोय या ठिकाणी करण्यात आली असून त्याची पाहणी करण्यात आली. काही शौचालयांची स्वतः जिल्हाधिकारी यांनी उघडून पाहणी केली आहे. शौचालय साफसफाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे निर्देश देऊन शौचालय उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सक्षम मशीन उपलब्ध करण्याचेही त्यांनी सूचित केले आहे. पंढरपूर शहर व परिसरात सुलभ इंटरनॅशनल शौचालयाची जेवढी शौचालये असतील ती सर्व शौचालये दिनांक १५ ते २१ जुलै या कालावधीत भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केलेले आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

शहरात एकूण ६५ हातपंप व मंदिर परिसरातील १२ विद्युत पंपाद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान १५० टँकरद्वारे संपूर्ण शहरात विशेषतः भक्ती सागर वाळवंट पालखी तळ पत्राशेड ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे.

भाविकांसाठी शौचालयाची उपलब्धता

शौचालय नियोजनामध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत व सुलभ शौचालयाची २९ ठिकाणी २०५४ सीट्स, नगरपरिषदेची कायमची २५ ठिकाणी १७६ सीट्स, ६५ एकर परिसरातील कायम स्वरुपी १२ ठिकाणी १८६४ सीट्स, प्री फॅब्रिकेटेड (नदी वाळवंट, ६५ एकर, पत्राशेड दर्शनबारी, शहरात विविध ठिकाणी) असे एकुण ७० ठिकाणी १९००सीट्स असे शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालावधीत मोकाट जनावरे पकडून त्यांना नगरपरिषदेने नव्याने बांधण्यात आलेल्या कोंडवाड्यामध्ये कोंडण्यात येत आहे.

वाहनांसाठी १३ ठिकाणी पार्किंगची सुविधा

पंढरपूर शहरामध्ये येणारी वाहने मुख्य रस्त्यावर किंवा प्रदक्षिणा मार्गावर येवून भाविकांना चालताना अडथळा अथवा त्रास होवू नये, म्हणून सर्व ठिकाणी लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. तसेच यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भाविकांच्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांसाठी १३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन प्रशासनाने बंद केल्याने तासनतास विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या हजारो भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्य भाविक वारकरी यांच्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सेवा २४ तास उपलब्ध केली असल्यानेही भाविक अत्यंतिक समाधानी झालेले आहेत.

मागील काही दिवसापासून पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून व्हीआयपी दर्शना बाबत नाराजी व्यक्त केली जात होती. सर्वसामान्य भाविक १० ते ३० तासापर्यंत दर्शन रांगेत उभा राहून श्री विठ्ठलाचे दर्शन घेत होता, परंतु व्हीआयपी दर्शनामुळे हा सर्वसामान्य भावीक नाराज झालेला होता. जिल्हा प्रशासन व मंदिर प्रशासनाने भाविकांच्या या नाराजीची दखल घेऊन सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले आहे. त्यामुळे दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेण्यास कमी कालावधी लागत आहे. तसेच प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची सेवा २४ तास उपलब्ध करून दिली असल्याने सर्वसामान्य भाविक अत्यंत समाधानी झालेला आहे.

हायमास्ट दिवे

पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत ९ हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर २०० वॅट एलईडी दिवे लावण्यात आले असून यात्रा कालावधीत प्रथमच कायमस्वरूपी लखुबाई मंदिर घाट, उद्धव घाट, कुंभार घाट व चंद्रभागा घाट चार ठिकाणी स्टेडियम वर असणारे फ्लड लाईटचे मोठे दिवे बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोयीसाठी संपूर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकरमध्ये १६० एलईडी दिवे व ६ हायमास्ट बसविण्यात आले आहेत. तसेच ६५ एकर भक्ती सागरमध्ये असलेल्या १२ युनिटमध्ये असलेल्या १८०० शौचालयामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला