मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या धोरणांसाठी स्थापन केलेल्या राज्य सल्लागार मंडळातील रिक्त पदे भरली असून हे मंडळ आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील. मंडळाच्या वर्षभरात दोनदा बैठकाही होतील, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. सरकारी वकील अभय पत्की यांनी ही माहिती देताना तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.
दिव्यांग व्यक्तींना फूटपाथवरील खांबांमुळे (बोलार्ड) व्हीलचेअर नेताना अडथळा येतो. जन्मापासून दिव्यांग असलेले करण शहा यांनी याकडे एका पत्राद्वारे लक्ष वेधले.
नरिमन पॉईंट येथील दिव्यांग व्यक्ती कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचे कार्यालय हे दिव्यांग हक्क सल्लागार मंडळाच्या सर्व कामांसाठी कार्यालय म्हणून काम करेल. मंडळाच्या कामकाजाबाबत संपर्क साधण्यासाठी एक ईमेल आयडी सुरू केला आहे.
सल्लागार मंडळाची पुढील महिन्यात पहिली बैठक पार पडेल. बैठकीत दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणाशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. त्यात शाळा, कार्यशाळा व अनाथाश्रमांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची नियतकालिक वैद्यकीय तपासणी करणे तसेच मुंबईतील पदपथ दिव्यांग व्यक्तींसाठी अधिक सुलभ करण्याकरिता उपाययोजनांचा आढावा घेणे अशा प्रमुख विषयांना प्राधान्य दिले जाईल.