सावंतवाडी : सह्याद्रीच्या घनदाट जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा समोर आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-चौकुळ-मसुरे मार्गावर मंगळवारी रात्री स्थानिक युवकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. रस्ता ओलांडणाऱ्या वाघाचा व्हिडिओ युवकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रात्री आठच्या सुमारास काही युवक वाहनाने प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर वाघ दिसला. सह्याद्रीतील आंबोली-चौकुळचा जंगल परिसर वाघांच्या अधिवासासाठी महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वीही या भागात अनेकदा पट्टेरी वाघांचे दर्शन झाले आहे.
गतवर्षी चौकुळ येथील जांभळाचे कोंड परिसरात पाण्यात डुंबणाऱ्या वाघाचे छायाचित्र स्थानिकांनी टिपले होते. त्यानंतर वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली होती. आता पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने या परिसरातील वन्यजीवांच्या अधिवासाचा विषय चर्चेत आला आहे. आगामी व्याघ्रगणनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या भागातील वाघांची अधिकृत संख्या स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.