मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 
महाराष्ट्र

‘लाडक्या बहिणी’ जमविणाऱ्या ‘ताई’च उपेक्षित! अंगणवाडी सेविकांना अद्याप प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकाच उपेक्षित राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

धनंजय कवठेकर/अलिबाग

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकाच उपेक्षित राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते. या योजनेमुळे महायुतीच्या मतांना ‘प्रोत्साहन’ मिळाले असले, तरी ‘ताई’पर्यंत भत्ता पोहोचलेलाच नसल्याने ताईंममध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर लाडक्या भावांना बहिणीच जवळच्या वाटत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात लाडकी बहीणीच्या माध्यमातून महिन्याला १५०० रुपये देण्याची योजना जाहीर केली. ही योजना अधिक सफल व्हावी यासाठी अंगणवाडी सेविकांना याची जबाबदारी देण्यात आली. राज्यातील अंगणवाडी ताईंनी दिवसरात्र एक करून ही योजना सफल केली. लडक्या बहिणी पाठोपाठ ताईंना देखील खूष करण्यासाठी महायुतीच्या शासनाने अंगणवाडी ताईंना प्रत्येक अर्जमागे ५० रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र आजपर्यंत अंगणवाडी ताई त्यांच्या हक्काच्या ५० रुपयांपासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्याचा विचार करता, सहा लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला. पण ज्या अंगणवाडी सेविका योजनेच्या अंमलबजावणीसाठी राबल्या, त्यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. रायगड जिल्ह्यात २ हजार २४ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यांनी २ लाख ७० हजार महिलांचे ऑनलाइन अर्ज भरून घेतले होते. शासन निर्णयानुसार १ कोटी ३५ लाख प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अपेक्षित आहे.

योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सहभागी करून घेतले होते. योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा, हा मूळ उद्देश होता. नियमित काम सांभाळत अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी नेटाने पार पाडली. गावागावांत जाऊन महिलांचे अर्ज भरून घेतले. अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला. तसेच अर्ज भरताना एखादीचा अर्ज काही कारणास्तव भरला गेला नाही, तेव्हा वादालादेखील तोंड द्यावे लागले. लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीतजास्त गरजू महिलांना लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे पन्नास रुपये मिळतील का, हा प्रश्न अंगणवाडी ताईंना पडला आहे.

अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेसाठी द्यायच्या प्रोत्साहन भत्याचा प्रस्ताव महिला बालविकास विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तो शासनस्तरावर प्रलंबित आहे, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.

- निर्मला कुविक, महिला व बालविकास अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

निवडणुकीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबदला मिळाला नाही. आता महिला व बालविकास खाते कुणाकडे जाते याची आम्हाला प्रतीक्षा आहे. नव्या मंत्र्याकडे ही आमची पहिली मागणी असेल.

- माया परमेश्वर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल