लता मंगेशकर आणि आशा भोसले. दोघी सख्ख्या बहिणी आणि जगविख्यात गायिका. दोघींपैकी कोण अधिक उत्तम गाते किंवा कोणाचा आवाज अधिक चांगला हे भल्याभाल्यांनाही सांगता आलं वा येणार नाही. चार वर्षांच्या अंतराने दोघीही वयाच्या ९२ व्या वर्षी आपल्या सर्वांना सोडून गेल्या. आशाताईंची बातमी तर अगदी अचानकच आली. शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल केलं आणि रविवारी सकाळी निधनाची धक्कादायक बातमी. मन अगदी सुन्न झालं. दीड दोन वर्षांपूर्वीच त्यांनी नातीबरोबर ‘सैंया बिना’ गीत गायलं होतं. त्यात लता, रफी, किशोर, पंचमदा, सलीलदा या संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गजांना त्यांनी नमन केलं होतं. त्या अल्बममध्ये छान दिसत होत्या. आजारपणाची किंचितही झाक नव्हती चेहऱ्यावर. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी गोड वा कधी खोडकर हास्य असे. कपड्यांच्या बाबतीतही टापटीप.
त्यांच्या गाण्यांवर किती तरी पिढ्या जगल्या. मन प्रेमात वा दुःखात गेलं असताना किंवा भक्तिरस वा शृंगार रसात रममाण झालं असताना आजही आठवतात आशाताईंचीच गाणी. अनेक जण दोन बहिणींची तुलना करतात. ती करणे योग्य नाही. तरीही आवाजाची व गाण्यांची विविधता आणि गाण्यांचे, गायकीचे प्रकार पाहिल्यास आशाताई किंचित का होईना, अधिक उजव्या होत्या. भजन, लावणी, प्रेम, विरह, अस्सल रोमान्स व शृंगार या पद्धतीची गाणी असोत, बालगीतं असो किंवा समोरच्याला घायाळ करणारी गाणी असोत, आशाताईनी ती लाजवाब पद्धतीने सादर केली. सुमारे ८० वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत विविध भाषांत १२ हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या आशाताईचे वर्णन चित्रपटसृष्टीच्या संगीतातील अखेरची सम्राज्ञी असेच करावे लागेल. अनेक गायिका आहेत आणि येतील, पण आशाताई या आशाताईच!
त्यांनी गायलेली बहुसंख्य गाणी जी खूप लोकप्रिय झाली, मराठीतील गाणीही खूप गाजली आणि लोकांना आवडली. पण त्यांच्या आवाजातील हिंदी गाण्यांची जादू वेगळीच होती. त्यांच्या समकालीन गायिकांमध्ये तशी जादू व विविधता दिसली नाही. काही अपवाद वगळता त्यांची इतर मराठी खूपच साधी सरळ होती. त्यात फार आव्हान नव्हतं, असं वाटतं. हिंदी संगीतकारांनी अनेक वेगवेगळ्या धाटाच्या, रागातील, स्टाईलच्या गाण्यांचे जणू आव्हानच उभे केले होते. पण प्रत्येक आव्हान आशाताईनी सहजतेने व आत्मविश्वासाने पेलले. त्यामुळे मराठीपेक्षा हिंदी गाण्यांत आशाताई अधिक खुल्ल्याआणि त्या गाण्यांनीच आपल्यावर गारुड निर्माण केलं.
जवळपास सर्व मराठी संगीतरसिकांची लहानपणीची आठवण ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ने सु्रू होते. ‘आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ ही गाणीही हृदयात रुतून राहिलेली. पुढे ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’, ‘असा मी काय गुन्हा केला’, ‘दिस जातील, दिस येतील‘, ‘आज प्रीतीला पंख हे’, ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’, ‘या डोळ्यांची दोन पाखरे’, ‘मी मज हरपून’ अशी शेकडो गाणी आपल्या मनात वसली आहेत. पण ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘गेले द्यायचे राहून’ ही गाणी अविस्मरणीय. शिवाय आशाताईंचा खास ठसका ‘गोमू संगतीनं’, अत्तराचा फाया तुम्ही‘, ’बुगडी माझी सांडली गं‘, रेशमाच्या रेघांनी’, ‘कंबर लचकली’ या लोकगीतांत जाणवल्याशिवाय राहत नाही.
हिन्दीतील ‘रंगीला रे तेरे रंग में’, ‘चुरा लिया है तुम मेरे’, ‘दम मारो दम’ ‘आओ हुजूर तुम को’, ‘कंबख्त इश्क’, ‘जाईये आप कहा जाएंगे’ आणि ‘दिल चीज क्या है’, ‘इन आँखो की मस्ती के’, ‘मेरा कुछ सामान’, ‘रात अकेली है’, ‘जब चली ठंडी हवा’, ‘आईये मेहरबान’ आशा गाण्यांत आशाताई अधिक खुलल्या, असे जाणवते. उमराव जानमधील प्रत्येक गाणं वेड लावणारं म्हणता येईल. ‘आओ ना गले लगाओ ना’, ‘आगे भी जाने न दू’, ही गाणी असोत किंवा जगजीत सिंह व गुलाम अली यांच्याबरोबर गायलेल्या गझल असोत, त्यात त्यांचा आवाज व त्यातील ठेवण कायम लक्षात राहते. मोहंमद रफी, मुकेश, किशोर यांच्यापासून उदित नारायण, शान, अभिजीत, सोनू निगम जवळपास सर्व गायकांसमवेत आशाताईंची गाणी आहेत. तिथे किंवा पंचमदा यांच्यासह गायलेल्या गाण्यात आशाताईनी आपल्या आवाजाचं वैशिष्ट्य नेहमीच दाखवून दिलं. ‘पिया तू अब तो आजा’, ‘सपना मेरा टूट गया’ ही वा अन्य कोणतीही गाणी पडद्यावर ऐकताना प्रत्यक्षात ती नायिका वा कॅबरे नर्तिका ते गात असल्याचा भास आपल्याला होत राहिला. याचे कारण आपण कोणासाठी हे गीत गात आहोत, त्या नायिकेची काय खासियत वा कमतरता आहे, हे त्या नेहमीच आधी समजून घ्यायच्या. टीव्हीवरील गाण्यांच्या शोमध्ये त्या संबंधित स्पर्धक गायक-गायिकेला गाण्यात कोणती जागा कशी व कुठे घ्यायची, हे सहज सांगत.
पहिल्या चांद्र मोहिमेच्या वेळी नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावर पाऊल टाकले होते. त्याचे नाव सर्वांना लक्षात आहे. त्याच्यासोबत कोण होता, असा प्रश्न त्यांनी एका मुलाखतीत प्रश्नकर्त्याला केला होता. त्या दुसऱ्याचे नाव कोणालाच आठवत नसेल. तसंच लता मंगेशकर व माझं आहे, असे त्यांनी सूचित केले होते. त्या मोहिमेतील दुसरा चांद्रवीर भले कोणाला आठवत नसेल. पण आशाताई, आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. इतका निर्भेळ आनंद व भरभरून संगीत तुम्ही आम्हाला दिलं आहे. संगीत क्षेत्रातील तुम्ही खरोखर सम्राज्ञी होतात. तुम्ही गेलात तरी आमच्यासाठी तुम्ही सम्राज्ञीच आहात!