महाराष्ट्र

मनोज जरांगेंचे मन वळवण्याचा प्रयत्न; भुमरेंनी घेतली भेट

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे.

Swapnil S

जालना : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. येत्या मंगळवारपासून ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. त्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन रविवारी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

भुमरे यांनी या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. “मनोज जरांगे यांची आपण नेहमीच भेट घेत असतो. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करत आहे. गॅझेटबाबतीत शंभूराज देसाई यांनी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर असून, आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर सर्व काही घालणार आहोत. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून दगाफटका होणार नाही. सगेसोयऱ्यांबाबत सरकारचे थोडेसे काम बाकी असल्याचे मनोज जरांगे यांना सांगितले आहे,” असे भुमरे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी याआधी आपण २९ सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता ते १७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात २८८ उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे-पाटील यांनी ठेवलेल्या मागण्या सरकार पूर्ण करणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणीही दगाफटका करू नये - जरांगे

सरकारने मराठा समाजाचे हित पाहावे. त्याचबरोबर हैदराबाद, सातारा या संस्थानांचे गॅझेट १७ सप्टेंबरपर्यंत लागू करावे. कोणीही दगाफटका करू नये. समाजाच्या मागण्यांबाबत विचार करावा. आमदारांना पुढे केले जात आहे. विरोधात आंदोलने उभी केली जात आहेत. याला मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. संभाजीनगरच्या पालक मंत्र्यांनी आणि खासदारांनी कोणताही दगाफटका मराठ्यांशी करू नये, तसेच मुख्यमंत्र्यांचे कान फुंकू नयेत, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू