मुंबई/ठाणे : बदलापुरात चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याप्रकरणी राज्य सीआयडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिंदेच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
या प्रकरणात वापरलेली पोलिसांच्या वाहनाची तपासणी न्यायवैज्ञक विज्ञान शाखेच्या तज्ज्ञांनी मंगळवारी केली. पोलिसांच्या कोठडीत असताना अक्षयचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची राज्य सीआयडीकडून चौकशी केली जाणार आहे. सीआयडीचे पथक मुंब्रा बायपास येथेही दुर्घटना स्थळाला भेट देऊन त्याची पाहणी करणार आहे. तसेच त्यावेळी वाहनात असलेल्या सर्व पोलिसांचे जबाबही नोंदवणार आहे. तसेच अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे जबाबही हे अधिकारी नोंदवतील, असे हा अधिकारी म्हणाला.
मंगळवारी सकाळी अक्षय शिंदे याचा मृतदेह कळवा रुग्णालयातून जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ हे शवविच्छेदन करण्यात आले.
दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल - राऊत
राज्यात आणि देशात अनेक एन्काऊंटर आम्ही पाहिले आहेत. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे, तेवढी गृहमंत्री आणि एन्काऊंटर करणाऱ्यांना माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर ‘पोक्सो’अंतर्गत का गुन्हा दाखल केला? आरोपीने आपल्या जबाबात काही खुलासे केले होते म्हणून त्याचे एन्काऊंटर झाले. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत.
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालाय, आता दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल, असे शिवसेना नेते (उबाठा) संजय राऊत यांनी सांगितले.
राऊत यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करावे - गोगावले
संजय राऊत यांचे डोके फिरले आहे. त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲॅडमिट केले पाहिजे, अशा खरमरीत शब्दांत भरत गोगावले यांनी टीका केली आहे. राज्यातील जनता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेल. त्यामुळे संजय राऊतांच्या पोटात दुखायला लागले आहे. त्यातूनच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदेंचे एन्काऊंटर करायला संजय राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील, असा पलटवार गोगावले यांनी केला.
विरोधकांचा एन्काऊंटर झाला - आशिष शेलार
अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकले, पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लगावला. आम्ही जे पुरावे गोळा केलेत त्यावर विरोधक प्रश्न विचारत आहेत, पण हा देवाचा न्याय असल्याचे सांगत आशिष शेलार यांनी अक्षयच्या एन्काऊंटरचे समर्थन केले. विरोधकांचा हा बेशरमपणा आहे. त्यांनी थोडे तरी अभ्यास करून बोलावे. त्यांना सर्व बाबींबर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत, असे शेलार म्हणाले.
शाळेच्या ट्रस्टींना का वाचवले जातेय -आदित्य ठाकरे
या चकमकीनंतर शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला प्रश्न केले आहेत. बदलापूरच्या शाळेचे ट्रस्टी कुठे आहेत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजप सरकार का करतेय?, शिंदेंचे स्थानिक नेते वामन म्हात्रेंना का वाचवले जातेय? महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या म्हात्रेंना सरकार का वाचवतेय?, बदलापूर आंदोलनकर्त्या विरोधातील दाखल गुन्हे मागे घेतले जाणार का?, शाळेचे विश्वस्त भाजपशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यांना वाचवले जातेय अशी चर्चा आहे. हे खरे आहे का? सरकार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल का?, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले.
जनतेने तुडवून मारले पाहिजे - भोसले
सत्ताधारी असो वा विरोधक त्यांच्या कुटुंबात अशी घटना घडली असती, तर काय केले असते? बोलले असते का की, त्या कुटुंबाचे काय? ज्यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागतेय. मी त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून हे बोलतो आहे. अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणे फारच सहज झाले, अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे आणि त्यांना जनतेने तुडवून मारले पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
अक्षयच्या वडिलांची हायकोर्टात धाव
दरम्यान, अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच अक्षयने पहिल्यांदा गोळी मारली, या पोलिसांच्या दाव्याला कुटुंबीयांनी आव्हान दिले आहे. फेक एन्काउंटरचा आरोप कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे. अक्षय शिंदे याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून बनावट चकमक प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला सोमवारी ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक चौकशीसाठी घेऊन जात होते. तेव्हा आरोपी शिंदेने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे या चकमकीत जखमी झाले आहेत.