पुणे, मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे काँग्रेसच्या आकाश मोरे यांच्यासह एकूण ५५ उमेदवारांनी या मतदारसंघातून अर्ज भरले. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसशी चर्चा करावी की नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचे आज उघड झाले. तर खुद्द बारामतीत कथित दादा समर्थकांनी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात लावलेल्या बॅनर्समुळे राष्ट्रवादीत सर्व काही ठीक नाही अशा चर्चेने पुन्हा जोर धरला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील अजितदादांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, मकरंद आबा पाटील, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बारामतीमधील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात महायुतीच्या नेत्यांचा मेळावा पार पडला. यात बोलताना सुनेत्रा भाऊक झाल्या होत्या. ही निवडणूक म्हणजे बारामतीकरांसाठी अजितदादांना श्रध्दांजली वाहण्याची संधी असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या की, दादा हे शब्दाला जागणारे होते व तोच त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न राहील. शरद पवार यांचा गट आणि व उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल याबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे विशेष आभार मानले. गेल्या ४० वर्षांपासून कुटुंबाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता बारामतीची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गाफील राहू नका –शिंदे
या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या कार्याची पोचपावती म्हणून या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विक्रमी विजय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असा सल्लाही शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पवार कुटुंबासोबतच- तटकरे
सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला की, त्यांनी केवळ अर्ज भरावा आणि थेट शेवटच्या सभेलाच यावे, बारामतीकर जनता त्यांना देशातील आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने निवडूनआणून एक नवा इतिहास घडवेल. हे मताधिक्य आजवरच्या संसदीय लोकशाहीतील कोणत्याही उमेदवारापेक्षा जास्त असावे, असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आमची साथ पवार कुटुंबाच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही देखील तटकरे यांनी या भूमीतून दिली.
दरम्यान, बॅनर्सवर आणि होत असलेल्या टीकेवर विचारले असता, प्रफुल्ल पटेल म्हणाले की, माझा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे; मी अशा प्रकारच्या गोष्टींवर कधीही प्रतिक्रिया देत नाही आणि त्याकडे लक्षही देत नाही. कोणाला काही पोटदुखी होत असेल तर त्यावर मी काय बोलणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
तटकरे-पटेलांविरुद्ध बॅनरबाजी
एकीकडे अर्ज भरला जात असतानाच बारामतीत स्वतःला दादाप्रेमी म्हणवणाऱ्यांनी शहरात पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात आक्रमक बॅनरबाजी केली. या बॅनरवर दोन्ही नेत्यांचा उल्लेख घातकी असा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. बारामतीमधील प्रशासकीय भवन परिसरामध्ये हे वादग्रस्त बॅनर झळकले आहेत.
काँग्रेसशी बोलणार नाही : शरद पवार
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसशी बोलणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसशी चर्चेवरून राष्ट्रवादीतच मतभेद
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसशी बोलावे की नाही यावरून खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचे सोमवारी समोर आले. सुनेत्रा पवार आता कोणाशीही बोलणार नाहीत असे खासदार पार्थ पवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. उमेदवार उभा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला याचे "परिणाम भोगावे लागतील", असा इशाराही त्यांनी दिला.
पार्थ पवार म्हणाले की, "मी (काँग्रेसमधील) कोणाशीही बोललो नाही. त्यांना परिस्थिती समजायला हवी. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. नशिबात जे लिहिले आहे तेच होईल. पण काँग्रेसची महाराष्ट्रात जी अधोगती सुरू आहे, त्याचे मला वाईट वाटते.
दरम्यान पार्थ ही भूमिका मांडत असताना, तटकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. यासाठी प्रफुल्ल पटेल आणि आपण स्वतः काँग्रेससह इतर राजकीय पक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून अर्ज मागे घेण्याच्यातारखेपर्यंत हे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रफुल्ल पटेल म्हणाले की,अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप तीन ते चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यादरम्यान सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. आपण स्वतः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खरगे सध्या केरळमध्ये आणि इतर ठिकाणी निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने त्यांच्याशी सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. या विषयावर चर्चा करण्यासाठी गरज पडल्यास आपण पुन्हा दिल्लीला जाण्यास आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यास तयार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.