बारामती पोटनिवडणुकीत मतदान टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याबाबत साशंकता  (Photo-X/@SunetraA_Pawar)
महाराष्ट्र

बारामती पोटनिवडणुकीत मतदान टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याबाबत साशंकता

Baramati By-Election : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के इतके मतदान झाले, तर सायंकाळी ६ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार साधारणपणे ५८.२७ टक्के एवढे मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

Swapnil S

पुणे : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के इतके मतदान झाले, तर सायंकाळी ६ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार साधारणपणे ५८.२७ टक्के एवढे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. यंदा मतदानाचा टक्का घसरला असल्याने उपमुख्यमंत्री व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. येथे सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांचे मागच्या २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेची ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

यावेळी सकाळी सात वाजता ४७८ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात काहीसा निरुत्साह होता. मात्र, हळूहळू मतदारांचा प्रतिसाद दिसून आला. सकाळी ७ ते ९ या वेळेत ८.१ टक्के मतदान झाले. सुनेत्रा पवार यांनी बूथ क्रमांक २३३ काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. खासदार पार्थ पवार यांनीही याच मतदान केंद्रावर मतदान केले. याशिवाय बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा

सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामतीत २०.५९ टक्के मतदानाची नोंद झाली. तर दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर उन्हाचा चटका सुरू झाल्यानंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला. तीन वाजेपर्यंत ४०.३० टक्के मतदान झाले. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळनंतर मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. ग्रामीण भागात मतदानासाठी लांबच लांब रांगा लांबल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तथापि, विक्रमी मतदानासाठी झालेले प्रयत्न काही प्रमाणात अपुरे पडल्याचे दिसून आले.

अपेक्षित विक्रमाबाबत साशंकता

बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्यासह करुणा मुंडे, अभिजित बिचुकले व अन्य २३ जण मैदानात आहेत. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी मतदानाची टक्केवारी पाहता २ लाख १७ हजारांचा विक्रम मोडणे शक्य होणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी

बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या ४ मे रोजी एमआयडीसी, बारामती येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे.

२०२९ मध्ये मीच उमेदवार : जय पवार

दरम्यान, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मीच उमेदवार असावा, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र, पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे मला वाटत असल्याचे वक्तव्य जय पवार यांनी केले. परंतु, नंतर त्यांनी आपल्या विधानापासून यू-टर्न घेतला. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहिले पाहिजे, अशी सारवासारव जय पवार यांनी केली.

युगेंद्र विरुद्ध जय अशी लढत होऊ शकते : रोहित पवार

आगामी २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते. खरे तर अशी लढत व्हायला नको. पण, युगेंद्र विरुद्ध जय पवार असा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. अजितदादा हयात असते, तर नक्कीच राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते. २०२९ पर्यंत पक्षाची ताकद वाढवून ते मुख्यमंत्रीही झाले असते. पण आता ते नसल्याने विलीनीकरणाचा मुद्दा पुढे येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

पवार विरुद्ध पवार लढाई नकोच : युगेंद्र पवार

युगेंद्र पवार म्हणाले, लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, दोन भावांमध्ये लढत होऊ नये, असे मला वाटते. २०२९ ला अजून बराच अवकाश आहे. तेव्हा दोन मतदारसंघही होऊ शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

श्रीनिवास पवारांनी टोचले दोघांचेही कान

आज फार महत्त्वाचा दिवस आहे. आपण सर्वजण पुढे येऊन दादांसाठी काम करत आहोत. त्यामुळे हे बोलायची ही वेळ नव्हती. दोघांनीही असे बोलायला नको होते, अशा शब्दांत काका श्रीनिवास पवार यांनी जय आणि रोहित पवार यांचे कान टोचले. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष व्हावा, असे बारामतीकरांना वाटत नाही. २०२९ ची निवडणूक अजून दूर आहे. भाजपला दोष देऊन उपयोग नाही. पवार कुटुंबीयांनी एकत्र बसून समजुतीने घ्यायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

प्रकृतीमुळे शरद पवार मतदानापासून वंचित

प्रकृती बिघडल्याने शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पवार यांना गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

आ. गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकावले, विरोधी पक्षांकडून कारवाईची मागणी

मतदानाचा विक्रम! पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९२, तर तमिळनाडूत सर्वाधिक ८५ टक्के मतदान

होर्मुझमध्ये अडथळा आणणाऱ्या इराणच्या बोटी उडवा; डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकी नौदलाला आदेश

मिर्झापूरमध्ये अपघातात ११ जणांचा मृत्यू

पुरवठा साखळीच्या मजबुतीवर ठरतो विजेता