संतोष तळाशिलकर
‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा देऊन हिंदू मतांचे ध्रुवीकरण, मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा मुद्द्याला रोखण्यात यश आणि ओबीसींची पडलेली भरभरून मते आदींमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक मुद्द्यांबरोबरच ‘बटेंगे तो कटेंगे’चा मुद्दा महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा की, इतिहासात ज्या ज्यावेळी हिंदूंमध्ये फूट पडली तेव्हा त्यांच्यावर अत्याचार झाले होते. याच घोषणेचा मोठा परिणाम या निवडणुकीत झाला. एका विशिष्ट धर्मीयांच्याविरोधात दिलेल्या या घोषणेमुळे हिंदू समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आपल्याला काहीतरी केले पाहिजे. त्यातून हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले. हे मतपेटीत उतरले. यामुळे महायुतीला दणदणीत विजय मिळाला.
यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडीला ४८ पैकी ३० जागा मिळाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही आपणच येणार, असा विश्वास मविआला होता. त्यादृष्टीने त्यांनी प्रचारही सुरू केला होता. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती व मविआमध्ये अटीतटीची होईल, असा सर्वांचाच कयास होता. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’वर जोरात भर द्यायला सुरुवात झाली. याचा योग्य तो परिणाम मतदारांवर झाला. एरव्ही निवडणुकीसाठी टाळाटाळ करणारे अनेक हिंदू या मतदानाला बाहेर पडले. त्यांच्या एकगठ्ठा मतदानाचा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर दिसून आला.
जरांगे फॅक्टर अपयशी
या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. मराठा समाजातील आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यात मोठे आंदोलन उभारले. ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. तसेच मुंबईपर्यंत त्यांनी लाँगमार्च काढण्याची घोषणा केली होती. त्यांनी लाँगमार्च सुरू केला. मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठवाड्यात जरांगे-पाटील यांचा फॅक्टर कळीचा मुद्दा ठरला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीचे पानिपत झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मुद्द्याचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजातून उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. तसेच आमच्या मागण्या मान्य न करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे त्यांनी ठरवले होते. उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. यामुळे महायुतीत मोठी खळबळ माजली होती. पण, निवडणुकीपूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत मराठा समाजाचा मुद्दा चालला नसल्याचे दिसत आहे.
ओबीसींचे भाजपला भरभरून मतदान
या निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा महत्त्वाचा होता. जरांगे यांनी मराठा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याला ओबीसी आंदोलनातून प्रत्युत्तर देण्यात आले. या निवडणुकीत ओबीसी समाजाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज हा मतांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे ही मते मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस होती. आता भाजपने सामाजिक अभिसरण घडवून ही परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने पारंपरिक मराठा मतांऐवजी ओबीसी व दलित मतदारांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हरयाणाच्या निवडणुकीत जाट मतदार हे विविध मुद्द्यांवरून भाजपवर नाराज होते. त्यामुळे भाजपने जाटांऐवजी ओबीसी-दलित मतांचे एकीकरण करून बाजी पलटवून लावली. या मतपेढीने हरयाणात भाजपला दुसऱ्यांदा सत्ता मिळवून दिली. आता महाराष्ट्रात याच पद्धतीने काम करण्यात आले. मराठा समाजाच्या मतदारांना समजण्याचे काम जोरदार करण्यात आले. मात्र, ओबीसी व हिंदू मतदारांवर मोठा भर भाजपने दिला. महाराष्ट्रात ओबीसी मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली.
या निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यात दोन हजारांहून अधिक बैठका घेतल्या. तसेच मराठा आरक्षणामुळे नाराज बनलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे काम केले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ‘न भूतो’ असे मताधिक्य मिळाले आहे.