फेसबुक
महाराष्ट्र

"...म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला"; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

थोड्यावेळापूर्वीच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. त्यानंतर, आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून राजीनाम्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

Krantee V. Kale

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी सकाळी मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. त्यानंतर, आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

"बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे", असे मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करीत म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात, मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यावर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्या होत्या. सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली होती. अशातच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र संतापाची प्रचंड लाट उसळली आणि अखेर मंगळवारी मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय झाला होता, असे समजते.

९ डिसेंबर २०२४ रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच (दि.१) जवळपास ८० दिवसांनी न्यायालयात १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार वाल्मिक कराड हाच देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.   

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली