पुणे: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवती अमावस्येचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि त्यातच यंदा 'अधिक मास' असल्याने या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले होते. "येळकोट येळकोट जय मल्हार" आणि "सदानंदाचा येळकोट" अशा गगनभेदी जयघोषात सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी जेजुरीत हजेरी लावून आपल्या कुलदैवताचे दर्शन घेतले. भंडार-खोबऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे संपूर्ण गड आणि जेजुरी नगरी पिवळीधमक होऊन 'सोन्याची जेजुरी' अवतरल्याचा प्रत्यय येत होता.
सोमवती अमावस्येचा पर्वकाळ रविवारी दुपारी १२.२० वाजता सुरू झाला होता आणि तो सोमवारी सकाळी ८.२४ वाजेपर्यंत होता. या मुहूर्ताचे औचित्य साधून ग्रामस्थ, मानकरी आणि खांदेकऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे शाही स्नानासाठी नेण्याचा निर्णय घेतला. रात्री २ वाजता मानकरी पेशवे यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्याने मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी, देवाचे पुजारी आणि उपाध्ये यांनी खंडोबा-म्हाळसाकांत यांच्या उत्सवमूर्ती विधिवत पालखीत विराजमान केल्या. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी सोहळा मुख्य प्रवेशद्वारातून गडकोटाबाहेर पडला.
हा पालखी सोहळा नंदी चौक, चिंचबागेतील होळकर ट्रस्टचे गौतमेश्वर मंदिर येथे पोहोचला, जिथे होळकरांचा मान स्वीकारण्यात आला. त्यानंतर सोहळा जानाई मंदिर चौक, शहरातील मुख्य शिवाजी महाराज चौक आणि कोथळे मार्गे पुढे सरकला. सोमवारी सकाळी ७ वाजता पालखी कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन स्नान घाटावर पोहोचली. शाहीस्नानानंतर सोमवती अमावस्या यात्रेची सांगता झाली आणि सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. शहरात कुळधर्म-कुलाचाराचे धार्मिक विधी सुरू होते. मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक आशिष बाठे यांनी भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी चोख नियोजन केले होते.
उत्सवमूर्तींना शाहीस्नान
येथे उत्सवमूर्तींना मंत्रोच्चारात विधिवत शाहीस्नान (जलाभिषेक) घालण्यात आले. या शाहीस्नानानंतर सोमवती अमावस्या यात्रेची सांगता झाली आणि सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.