राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून भुजबळांच्या नावाची चर्चा; पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून भुजबळांच्या नावाची चर्चा; पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या एका जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक घोषित केली. घोषित कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकीची अधिसूचना १ जून रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ८ जून अशी आहे. उमेदवारी अर्जाची छाननी दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ जूनला जाईल. पोटनिवडणुकीत अर्ज माघारीची मुदत ११ जून अशी असून आवश्यकता भासल्यास १८ जूनला मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होईल.

पोटनिवडणुकीनंतर पुन्हा पोटनिवडणूक

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांची राज्यसभेची मुदत शिल्लक असतानाही त्यांना २०२४ च्या द्विवार्षिक निवडणुकीत उमेदवारी दिली होती. राज्यसभेवर नव्याने निवडून आल्यानंतर पटेल यांनी राज्यसभेच्या एका जागेचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीद्वारे राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. त्यांची राज्यसभेची मुदत ४ जुलै २०२८ पर्यंत होती. आता याच जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक होत असल्याने पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान, राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. भुजबळ यांनी यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांचे नाव निश्चित होऊ शकते. मात्र, राज्यसभेची उमेदवारी दिल्यास पुतण्या समीरला मंत्रिपद द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोर भुजबळ यांच्या उमेदवारीचा पेच आहे.

Mumbai : मेट्रो लाइन-३ वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळणार

३८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा मोठे फेरबदल

घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक! उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध; सुधार समितीत तीव्र विरोध करणार, गटनेते अश्रफ आजमी यांचा इशारा

इंधन साठेबाजी करू देऊ नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश