सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी झाल्या.
सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा
सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामाX
Published on

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी झाल्या. विधानसभा निवडणुकीला सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर झाला, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेत राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेत चार खासदार होते. आता सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांची राज्यसभेतील संख्या ३ झाली आहे. या तीन खासदारांमध्ये प्रफुल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील यांचा समावेश आहे. प्रफुल पटेल २०२४मध्ये राज्यसभेचे खासदार बनल्याने त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत राहील. प्रफुल पटेल २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत गेले. यामुळे त्यांनी जुन्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा ६ वर्षांसाठी खासदार बनले.

महाराष्ट्रातून गेल्या महिन्यात ७ खासदारांची निवड राज्यसभेत करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना संधी दिली. यामुळे पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून २०३२ पर्यंत कार्यरत राहतील.

छगन भुजबळ, जय पवार यांची नावे चर्चेत

सुनेत्रा पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता त्यांनी राजीनामा दिल्यानं साधारणपणे दोन ते अडीच वर्षे कालावधी शिल्लक असलेल्या राज्यसभेच्या खासदारकीवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ आणि जय पवार यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in