जळगाव : दोन वर्षांपूर्वी मुलीने प्रेम विवाह केला याचा राग बापाच्या डोक्यात होता. लग्नानंतर मुलगी आणि तिचा पती हे एका कार्यक्रमासाठी चोपडा येथे आल्याचे कळताच सीआरपीफच्या निवृत्त जवानाने घटनास्थळी जाऊन मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर जावई जखमी झाला आहे. यानंतर झालेल्या हाणामारीत मुलीचा सासरा जखमी झाला आहे. चोपडा येथे शनिवारी रात्री दहा वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
तृप्तीने (२४) दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८) याच्याशी प्रेम विवाह केला होता. विवाहानंतर तृप्ती आणि अविनाश पुण्यातील कोथरूड येथे राहत होते. मुलीचे वडील करण अर्जन मंगले (४८) यास हा विवाह पसंत नव्हता. याचा राग करण मंगले यांच्या मनात होता. शनिवारी अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम चोपडा येथील आंबेडकर नगर येथे होता. त्या कारणास्तव तृप्ती व अविनाश आल्याची माहिती तृप्तीच्या वडिलांना माहित पडली. सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या करण मंगले याने कार्यक्रमस्थळी जाऊन त्याच्याजवळ असलेल्या रिव्हॉव्हरने तृप्ती आणि अविनाशवर तीन राऊंड फायर केले. यात तृप्ती ही जागीच ठार झाली तर तिला वाचवायला गेलेला अविनाश गोळी लागून जबर जखमी झाल्याने त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने उपस्थित वऱ्हाडींचा संताप अनावर झाल्याने गोळीबार करणाऱ्या करण मंगलेला मारहाण केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.