महाराष्ट्र

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनाला न्यायालयाची स्थगिती

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने तत्काळ स्थगिती दिली आहे.

Swapnil S

पंढरपूर : कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूर येथील स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने तत्काळ स्थगिती दिली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून हे लेपन केले जाणार होते. मात्र, वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुरुषोत्तम लंके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश सोनाली राऊळ यांनी पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता सुधीर रानडे यांनी न्यायालयात भक्कम युक्तिवाद केला.

या निर्णयावर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी समाधान व्यक्त केले आहे. तब्बल २८ युगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या आणि श्री रुक्मिणीमातेच्या पायाला हानी कशी झाली, याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर मंदिर समितीने दिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

कोणती रसायने वापरली जाणार याची स्पष्ट माहिती न देता अचानक वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मूर्ती संवर्धनासाठी आयुर्वेदिक वज्रलेप हा अधिक सुरक्षित आणि परंपरेला अनुरूप पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले असून मंदिर समितीने आतातरी वारकरी आणि संतांच्या भावनांचा आदर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मूर्तीचे पावित्र्य बाधित होण्याची शक्यता

हिंदू धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व असते, त्यामुळे इपॉक्सीसारख्या कृत्रिम व रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे मूर्तीचे पावित्र्य बाधित होऊ शकते, असा दावा याचिकेत करण्यात आला. यापूर्वी चार वेळा झालेल्या रासायनिक लेपनाचे अपेक्षित परीणाम झाले नसून, कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती अधिक ठिसूळ होण्याचा धोका असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 'महाकालेश्वर मंदिर' प्रकरणात दिलेल्या निर्देशांचा आणि करवीर पीठाच्या जगद्गुरू शंकराचार्यांच्या विरोध पत्राचा संदर्भही यावेळी देण्यात आला.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू