पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘अर्णव’ चक्रीवादळ आकार घेत असून, या हवामान प्रणालीच्या प्रभावातून २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, पुढील दोन दिवस हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज असला तरी २७ ऑक्टोबरपासून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. याच काळात कोकण किनारपट्टीवरही हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. २९ ऑक्टोबर रोजीही पावसाचा प्रभाव कायम राहणार असून रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, जालना, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून तेथे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल.
अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस
या चक्रीवादळाचा थेट तडाखा जरी महाराष्ट्राला बसणार नसला, तरी विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचे सावट निर्माण होणार आहे. याशिवाय २८ ऑक्टोबरला कोल्हापूर घाट क्षेत्र, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात या वादळी प्रणालीचा प्रभाव सर्वाधिक जाणवणार असून २७ आणि २८ तारखेला विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावेल.