Pune : गणेशोत्सवानिमित्त यंदा वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती; दगडूशेठ गणपतीसमोर राधा-कृष्णाच्या दिव्य प्रेमाचा आध्यात्मिक प्रवास (Photo-X/@HemantNRasane)
महाराष्ट्र

Pune : गणेशोत्सवानिमित्त यंदा वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती; दगडूशेठ गणपतीसमोर राधा-कृष्णाच्या दिव्य प्रेमाचा आध्यात्मिक प्रवास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

Swapnil S

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णप्रती असलेले दिव्य प्रेम आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या मंदिराच्या तेजस्वी प्रतिकृतीमुळे भाविकांना प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास अनुभवता येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस तथा आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतीश रासने, तुषार रायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यातील सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात यंदाच्या देखाव्याच्या कामाचा शुभारंभ कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

‘जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते’ या संकल्पनेवर आधारित साकारण्यात येणाऱ्या या प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. उत्तर भारतीय कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, भौतिकवाद आणि विभाजनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जगात प्रेम, भक्ती, सलोखा आणि श्रद्धा या मानवतेला एकत्र बांधणाऱ्या मूल्यांचा संदेश या प्रतिकृतीद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बुधवार चौकात भव्य कमान उभारण्यात येणार असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात येईल. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवात कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारले जाणार आहेत. तसेच मंदिराच्या दर्शनी भागावर राधा-कृष्णाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. गाभारा आणि मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत ठेवण्यात येणार असून भाविकांना दूरवरूनही श्रींचे सहज दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांच्या माध्यमातून या प्रतिकृतीची उभारणी केली जात असून, गणेशोत्सव २०२६ मध्ये देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात वृंदावनच्या विलोभनीय प्रेम मंदिराचे दर्शन घडणार आहे. या देखाव्याद्वारे देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडत असून, राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रसिद्ध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती साकारण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहिला आहे. यंदा उभारण्यात येणारे प्रेम मंदिर हे पांढऱ्या संगमरवरी वास्तुकलेसाठी, नाजूक कोरीव कामासाठी, भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांच्या दर्शनासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे या मंदिराची प्रतिकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
हेमंत रासने, आमदार

Mumbai : वायू गुणवत्ता सेन्सरचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; लेखापरीक्षणासाठी १३ कोटींचा खर्च

Mumbai : केईएम रुग्णालयाला अखेर नवीन एमआरआय मशीन मिळणार; BMC च्या चार मोठ्या रुग्णालयांसाठी एमआरआय यंत्रे खरेदी

Mumbai : पवई तलावात १ ऑक्टोबरपासून सांडपाणी सोडणे होणार बंद; पुनर्विकासासाठी १.८५ कोटींचा खर्च

Thane : पहिली वातानुकूलित डबलडेकर बस अखेर रस्त्यावर; चार्जिंग सुविधेच्या समस्येनंतर पर्यायी व्यवस्था, सर्कल-भाईंदरपाडा मार्गावर धावली

भारतीयांचा स्विस बँकांमधील पैसा आटला; निधीमधील घसरणीचा फटका; वर्ष २०२५ मध्ये बँकेतील ठेवी ८ टक्क्यांहून अधिक घसरल्या