भारतीयांचा स्विस बँकांमधील पैसा आटला; निधीमधील घसरणीचा फटका; वर्ष २०२५ मध्ये बँकेतील ठेवी ८ टक्क्यांहून अधिक घसरल्या

स्विस बँकांमध्ये जमा असलेला भारतीयांचा एकूण पैसा वर्ष २०२५ मध्ये ८ टक्क्यांहून अधिक घटून ३.२५ अब्ज स्विस फ्रँक (३६,७९३ कोटी रुपये) झाला आहे.
भारतीयांचा स्विस बँकांमधील पैसा आटला; निधीमधील घसरणीचा फटका; वर्ष २०२५ मध्ये बँकेतील ठेवी ८ टक्क्यांहून अधिक घसरल्या
भारतीयांचा स्विस बँकांमधील पैसा आटला; निधीमधील घसरणीचा फटका; वर्ष २०२५ मध्ये बँकेतील ठेवी ८ टक्क्यांहून अधिक घसरल्या'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली / झुरिच : स्विस बँकांमध्ये जमा असलेला भारतीयांचा एकूण पैसा वर्ष २०२५ मध्ये ८ टक्क्यांहून अधिक घटून ३.२५ अब्ज स्विस फ्रँक (३६,७९३ कोटी रुपये) झाला आहे. स्थानिक शाखा, इतर वित्तीय संस्थांद्वारे ठेवलेल्या निधीमध्ये घट झाल्यामुळे ही घसरण झाली असल्याचे स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने (स्विस नॅशनल बँक) गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीवरून समोर आले आहे.

वैयक्तिक आणि संस्थात्मक ग्राहकांच्या खात्यांमधील पैशांमध्ये या वर्षात ५० टक्क्यांहून अधिक मोठी वाढ झाली असून तो ५२४ दशलक्ष स्विस फ्रँक (६,००० कोटी रुपये) झाला आहे. अर्थात, एकूण निधीमध्ये या खात्यांचा वाटा केवळ १६ टक्के आहे.

हा एकूण निधी २००६ मध्ये ६.५ अब्ज स्विस फ्रँकच्या विक्रमी पातळीवर होता, त्यानंतर काही वर्षे (उदा. २०११, २०१३, २०१७, २०२० ते २०२४) वगळता तो सातत्याने घटत चालला आहे.

ही बँकांनी स्विस नॅशनल बँकेला दिलेली अधिकृत आकडेवारी आहे. ही आकडेवारी स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या कथित काळ्या पैशाचे प्रमाण दर्शवत नाही. यामध्ये भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी तिसऱ्या देशांतील कंपन्यांच्या नावाने स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांचा समावेश नाही.

स्विस अधिकाऱ्यांनी नेहमीच स्पष्ट केले की, स्वित्झर्लंडमध्ये भारतीय रहिवाशांनी ठेवलेली मालमत्ता ‘काळा पैसा’ मानली जाऊ शकत नाही. ते कर फसवणूक आणि कर चोरीच्या विरोधातील लढ्यात भारताला सक्रिय पाठिंबा देतात.

भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान २०१८ पासून कर प्रकरणांमध्ये माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण लागू आहे. २०१८ पासून स्विस वित्तीय संस्थांमध्ये खाती असलेल्या सर्व भारतीय रहिवाशांची सविस्तर माहिती सप्टेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदा भारतीय कर अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि दरवर्षी ही प्रक्रिया पाळली जात आहे.

स्विस बँकेतील भारतीय निधी

  • एकूण निधी (२०२५ अखेर) : ३.२५ अब्ज स्विस फ्रँक (३६,७९३ कोटी रुपये) - ८.५% घसरण

  • ग्राहक ठेवी : ५२४ दशलक्ष स्विस फ्रँक (६,००० कोटी रुपये) ५०% पेक्षा जास्त वाढ

  • इतर बँकांद्वारे निधी : २.६ अब्ज स्विस फ्रँक (जवळपास १५% घसरण)

  • भारताचा जागतिक क्रमांक : ४६ वा (२०२४ मधील ४८ व्या स्थानावरून सुधारणा)

  • शीर्ष ३ देश (सर्वाधिक पैसा) : युनायटेड किंगडम (१९२ अब्ज फ्रँक), अमेरिका (७५ अब्ज फ्रँक), फ्रान्स (६३ अब्ज फ्रँक)

निधीचे वर्गीकरण :

स्विस नॅशनल बँकेने २०२५ च्या अखेरीस स्विस बँकांची भारतीयांप्रति असलेली ‘एकूण दायित्वे’ म्हणून ३,२५०.५ दशलक्ष स्विस फ्रँकची नोंद केली आहे. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे.

  • ग्राहक ठेवी : ५२४ दशलक्ष स्विस फ्रँक

  • इतर बँकांद्वारे ठेवलेला निधी : २.६ अब्ज स्विस फ्रँक

  • विश्वस्त संस्था : १८.६ दशलक्ष स्विस फ्रँक (४१ दशलक्षवरून ५५ टक्के घसरण)

  • बाँड्स आणि सिक्युरिटीज : १०५.७ दशलक्ष स्विस फ्रँक (१३५ दशलक्षवरून घसरण)

logo
marathi.freepressjournal.in