बांगलादेशींसाठी टूलची निर्मिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; सी-६० दलातील पोलिसांना विशेष पदक X (CMOMaharashtra)
महाराष्ट्र

बांगलादेशींसाठी टूलची निर्मिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; सी-६० दलातील पोलिसांना विशेष पदक

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात माओवाद संपवण्यासाठी नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या सी-६० तुकडीमध्ये ३ वर्षे सेवा करणाऱ्या पोलिसांना विशेष पदक देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. तसेच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी डेटा-आधारित टूल विकसित केली जाणार असून, यासाठी मुंबई आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे.

Swapnil S

मुंबई : गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात माओवाद संपवण्यासाठी नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या सी-६० तुकडीमध्ये ३ वर्षे सेवा करणाऱ्या पोलिसांना विशेष पदक देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. तसेच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर शोधण्यासाठी डेटा-आधारित टूल विकसित केली जाणार असून, यासाठी मुंबई आयआयटीचे सहकार्य घेतले जात आहे. या टूलची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते प्रत्यक्ष वापरात आणले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद मुंबईत पार पडली. या परिषदेनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी नक्षलवाद निर्मूलन, पोलिसिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, राज्यातील अपराध सिद्धीचा दर आणि ड्रग तस्करीविरोधातील मोठ्या कारवाईचा रोडमॅप मांडला.

महाराष्ट्रातून नक्षलवाद संपवण्यात सी-६० दलाचे योगदान मोठे आहे. राज्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले. तसेच या लढ्यात शहीद झालेल्या २४४ जवानांना फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. फडणवीस यांनी यावेळी अमली पदार्थांच्या विरोधात मोठ्या लढाईची घोषणा केली. शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक नवीन रणनीती तयार करत असून महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी संगितले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, एफआयआर नोंदणीपासून आरोपपत्र आणि ट्रायलपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सहा महिन्यांत डिजिटल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुराव्यांची सुरक्षितता राखण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच मागील ४-५ वर्षांतील अपयशी ठरलेल्या गुन्हे प्रकरणांचे विश्लेषण करण्यासाठी सीआयडीला एआय टूल्स वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून सध्याचा ५० टक्के अपराध सिद्धीचा दर ९० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

पोलीस विभागातील जबाबदारी वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी मासिक ग्रेडिंग प्रणाली लागू केली जाणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पोलीस महासंचालकांकडून पुरस्कार दिले जातील. तर मागे राहणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवून सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. परिषदेत रस्ता सुरक्षा, धार्मिक ताणतणाव, सामाजिक आंदोलने, सायबर सुरक्षा, पोलिसांसमोरील आव्हाने यावर परिषदेत चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी रजेवर

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी रजेवर गेले आहेत, याविषयी फडणवीस यांना विचारले असता चौकशीवर परिणाम होऊ नये यासाठी दोशी रजेवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

कर्जतमध्ये मिरचीचे दर दुप्पट; गृहिणींना महागाईचा ठसका; परदेशात मसाल्यांची निर्यात

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तेलंगण सरकारचा कठोर कायदा! आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के कपात