मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या काही ठिकाणी इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. सरकारने या प्रकरणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल - डिझेल विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी 'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा प्लॅन तयार असल्याचेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पेट्रोल - डिझेलच्या सद्यस्थितीवरही भाष्य करताना सांगितले की, सरकारने या प्रकरणी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पेट्रोल - डिझेल विशेषतः डिझेल सध्या शेतीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना यात जातीने लक्ष घालून यासंबंधी नीट प्लॅनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कुणालाही साठेबाजी करू देऊ नका असे सांगितले आहे. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळाले पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी निश्चितच तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडते आणि तिचा गाजावाजा होतो. पण तो ही होऊ नये याचा प्रयत्न सरकार करेल.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा प्लॅन तयार केला आहे. अल निनोमुळे वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस होईल. काही ठिकाणी पावसाचा तुटवडा जास्तही असू शकतो. या प्रकरणी जी काही खबरदारी घ्यायची आहे, ती घेईल, असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
केंद्र सरकार राज्यांसोबत मिळून पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार लवकरच राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची विनंती करू शकते. भाजपशासित २२ राज्यांमध्ये व्हॅट कपातीची पूर्ण शक्यता आहे. डिझेलच्या किमती नियंत्रित करणे हे प्राधान्य आहे, कारण त्याचा थेट परिणाम वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रावर होतो.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. शुक्रवारी ब्रेंट क्रूड सुमारे १.९ टक्के वाढून $१०४.५२ प्रति बॅरलवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईतून लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या महिन्यातच पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) कमी केले होते. मात्र, त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ३.९० रुपयांची वाढ करण्यात आली होती.