मुंबई : अनेक लोकांना वाटते की मी दिल्लीत गेलो पाहिजे. पण मी मुंबईतच आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत आहे आणि करतच राहणार आहे, असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याची शक्यता फेटाळून लावली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. आजच्या दिल्ली दौऱ्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.
उत्तन-विरार कॉरिडोरसाठी निधी उभारणी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडोर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. सुमारे ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फत (जायका) वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने सादर केला आहे.
केंद्रीय मदतीने विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहतींबाबत सीतारामन आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतही चर्चा होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीसाठी आणखी ८,००० एकर जमीन संपादित करण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची मागणी महाराष्ट्र करणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे दिल्ली-नागपूर औद्योगिक कॉरिडॉरलगत औद्योगिक वसाहतीसाठी ६,००० एकर जमीन संपादित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरवर MIDC विकसित करण्यासाठीही केंद्राकडून सहकार्य घेण्यात येणार आहे. केंद्राच्या औद्योगिक पार्क योजनेचा महाराष्ट्राला लाभ मिळेल, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती तसेच केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून, त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली.
रिकामटेकडे पतंग
दिल्लीत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरी चर्चा होतात. अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना चर्चा करायला आनंद मिळतो तो त्यांना बोलू द्या. ज्यांना जे तारे तोडायचे आहेत फुगे, पतंग उडवू द्या, मी महाराष्ट्रात आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
मोदींना निमंत्रण
पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक- खासगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.