पुणेः जात वैधता प्रमाणपत्रांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रक्रिया सुरू असून त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्पष्ट केले. सातारा गॅझेट लागू करण्याबाबत विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखूनच पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा एकवार उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. विद्यमान सरकारने मराठा समाजासाठी जेवढे काम केले आहे, तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झाले नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 'सारथी' संस्थेच्या माध्यमातून आज अनेक तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने विक्रमी संख्येत उद्योजक तयार केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी निर्वाह भत्ता योजना सुरू आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात कोणतेही ऊर्जा संकट नाही. राज्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त वीज उपलब्ध असून, केवळ ग्रीड बिघाडामुळे काही ठिकाणी तात्पुरती समस्या उद्भवू शकते, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
कर्जमाफीची तयारी आता अंतिम टप्प्यात असून मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली आहे. काही अतिरिक्त माहिती मागवण्यात आली असून ती प्राप्त होताच ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल. ३० जूनपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
'पुणे ॲग्री हॅकथॉन' २०२६ पारितोषिक वितरण व समारोप समारंभ फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे ॲग्री हॅकथॉनमध्ये माती परीक्षण, कीड व्यवस्थापन, पेरणी आणि कापणी तंत्रज्ञान अशा नऊ विविध क्षेत्रांतील संशोधनासाठी १८ संशोधकांना गौरवण्यात आले. मागील वर्षीच्या हॅकथॉनमधील चार उत्पादने आधीच बाजारात आली असून, १२ उत्पादने लवकरच उपलब्ध होतील. या संशोधनामुळे पाणी, युरिया आणि इतर खतांचा अत्यंत अचूक वापर करणे शक्य होणार आहे. या उपक्रमाचे यश पाहून पुढील वर्षापासून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र ॲग्री हॅकथॉन' या नावाने राबवला जाईल आणि त्यातील पहिला पुरस्कार स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने देण्यात येईल, असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
पार्थ पवार भेटणे ही मोठी बातमी नाही
काल मला पार्थ पवार येऊन भेटले. काही प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते. त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळं ते मला येऊन भेटणे ही काही मोठी बातमी आहे, असं मला वाटत नाही असे फडणवीस यांनी नमूद केले.