

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बनावट लिंक, केवायसी अपडेट, गुंतवणुकीचे आमिष, पार्टटाईम जॉब किंवा यूपीआय व्यवहाराच्या नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. मात्र, अशा वेळी घाबरून न जाता तातडीने योग्य पावले उचलल्यास गमावलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता वाढू शकते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) यासाठी ग्रिव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम (GRM) आणि मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) ही प्रणाली सुरू केली आहे. जाणून घ्या सायबर फसवणूक झाल्यास नेमके काय करावे.
'गोल्डन अवर' का महत्त्वाचा आहे?
सायबर फसवणूक झाल्यानंतरचा सुरुवातीचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात तक्रार नोंदवल्यास संबंधित व्यवहाराचा मागोवा घेऊन रक्कम गोठवण्याची (Freeze) प्रक्रिया तातडीने सुरू करता येते. त्यामुळे पैसे दुसऱ्या खात्यात जाण्यापूर्वी ते रोखण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फसवणुकीची माहिती मिळताच वेळ न दवडता कारवाई करणे आवश्यक आहे.
सायबर फसवणूक झाल्यास लगेच काय कराल?
१. तातडीने १९३० हेल्पलाइनवर कॉल करा
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यानंतर सर्वप्रथम १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा. कॉल करताना व्यवहाराची रक्कम, UTR/Transaction ID, संबंधित खाते क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती तयार ठेवा. अधिकाऱ्यांना आर्थिक फसवणुकीची माहिती देऊन संबंधित व्यवहार तातडीने तपासण्याची विनंती करा.
२. ऑनलाइन तक्रार नोंदवा
त्यानंतर National Cyber Crime Reporting Portal वर जाऊन आर्थिक फसवणुकीची ऑनलाइन तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवल्यानंतर मिळणारा Complaint ID सुरक्षित जतन करून ठेवा. पुढील प्रक्रियेत त्याची आवश्यकता भासू शकते.
३. आपल्या बँकेलाही त्वरित माहिती द्या
ज्या बँक खात्यातून पैसे गेले आहेत त्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी किंवा शाखेशी तातडीने संपर्क साधा. संबंधित व्यवहाराबाबत आक्षेप (Transaction Dispute) नोंदवा आणि आवश्यक असल्यास ई-मेलद्वारेही माहिती द्या.
४. सर्व पुरावे जपून ठेवा
व्यवहाराचे स्क्रीनशॉट, एसएमएस, UTR नंबर, बँकेचा व्यवहार तपशील, फसवणूक करणाऱ्याशी झालेले चॅट किंवा कॉलची माहिती यांसारखे सर्व पुरावे सुरक्षित ठेवा. तपास आणि पुढील प्रक्रियेसाठी ही माहिती महत्त्वाची ठरते.
५. MRM पोर्टलद्वारे रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया
बँकेकडून आवश्यक माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत झाल्यानंतर Money Restoration Module (MRM) च्या माध्यमातून रक्कम परत मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. या प्रक्रियेत पीडित, तपास यंत्रणा आणि संबंधित बँका यांच्यात समन्वय साधला जातो.
GRM आणि MRM प्रणालीचा काय फायदा?
यापूर्वी सायबर फसवणुकीतील पैसे परत मिळवण्यासाठी नागरिकांना बँका, पोलिस आणि न्यायालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. नव्या GRM आणि MRM प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकाच खात्याशी संबंधित अनेक तक्रारी असल्यास उपलब्ध रकमेचे वाटप कायदेशीर तरतुदींनुसार केले जाऊ शकते.
लक्षात ठेवा...
सायबर फसवणूक झाल्यास प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे पैसे गेल्याचे लक्षात येताच तातडीने १९३० हेल्पलाइन आणि National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवा. जितक्या लवकर कारवाई होईल, तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.