फडणवीस अचानक दिल्लीला, चर्चांना उधाण; भेटीगाठींबाबत गुप्तता, काही तासांनंतर नागपुरात परत संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

फडणवीस अचानक दिल्लीला, चर्चांना उधाण; भेटीगाठींबाबत गुप्तता, काही तासांनंतर नागपुरात परत

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले. फडणवीसांनी शनिवारी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या आणि काही तासांच्या दिल्ली भेटीनंतर ते लगेच नागपूरला परतले. दिल्लीत ते कुणाला भेटले, कुणाशी काय चर्चा केली याविषयी अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी पहाटे पंढरपूर येथे शासकीय महापूजा केली. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते सोलापूरहून थेट दिल्लीला रवाना झाले. त्यांचा दिल्ली दौरा हा अवघ्या काही तासांचा होता. दिल्लीतील भेटीगाठी आटोपून फडणवीस संध्याकाळी नागपूरमध्ये दाखल झाले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. शिक्षण खात्याची जबाबदारी तूर्तास प्रल्हाद जोशींकडे दिली असली तरी कायमस्वरूपी ती कुणाकडे सोपवावी, असा प्रश्न सध्या भाजप नेतृत्वासमोर आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी या चर्चेचा इन्कार केला असला तरीही आजच्या दिल्ली भेटीने राजकीय वर्तुळात ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज वर्तवली. फडणवीस हे उच्चशिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्रामध्ये नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, आता त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राऊत म्हणाले.

देवेंद्रजी राज्यातच राहणार : अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जाण्याची शक्यता फेटाळून लावली. मला महाराष्ट्रातच राहायचे आहे. मी देवेंद्रजी यांना महाराष्ट्रातच ठेवणार, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांनी सत्ताधीशांना झुकवले! धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; अन्य मागण्याही मान्य, सरकारवर विश्वास ठेवून आंदोलन मागे - CJP ची घोषणा

ही पहिली विकेट आहे - अभिजीत दिपके

विद्यार्थ्यांचे हित, देशाच्या एकतेसाठी निर्णय - धर्मेंद्र प्रधान

महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : TET पेपरफुटीचा सूत्रधार अटकेत

Shahapur : भातसा वाहू लागले; मुंबईकरांची चिंता मिटली