राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुनेच्या विजयाचा अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनाली अमोल लांडे यांनी जुन्नर तालुक्यातील बारव-तांबे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असून, त्यानंतर त्यांचे सासरे देवराम लांडे यांनी केवळ लंगोट परिधान करून जल्लोष केला.
आपला दादा सदैव स्मरणात
या मिरवणुकीदरम्यान एका कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसलेल्या देवराम लांडे यांच्या हातात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो दिसून आला. त्या फोटोवर "आपला दादा सदैव स्मरणात" अशी भावनिक ओळ लिहिलेली होती. अजित पवारांवरील आपली निष्ठा आणि मिळालेल्या विजयाचा आनंद लांडे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. विजयाचा जल्लोष करताना देवराम लांडे केवळ लंगोटवर होते.
डीजेच्या तालावर ठेका
ही मिरवणूक पाहण्यासाठी जुन्नर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मिरवणुकीत लांडे यांनी डीजेच्या तालावर ठेकाही धरला. राजकीय क्षेत्रात देवराम लांडे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे किंवा कृतीमुळे वारंवार चर्चेत येत असतात आणि याही वेळी त्यांचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
विविध पक्षांमध्ये चुरशीची लढत
दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजता सुरू झाली. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल जाहीर होत असून, सुरुवातीच्या कलांमध्ये विविध पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
कोणाची आघाडी? कोण पिछाडीवर?
सुरुवातीच्या कलांनुसार, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडे जाहीर झाले नसले तरी, माध्यमांच्या माहितीनुसार दुपारी २ वाजेपर्यंत भाजप ७३१ पैकी सुमारे २०० जिल्हा परिषद जागांवर आघाडीवर होती, तर शिंदे गटाची शिवसेना १३७ जागांवर पुढे होती. राष्ट्रवादी काँग्रेस १२० जागांवर, काँग्रेस ४६ जागांवर, शिवसेना (ठाकरे गट) ३३ जागांवर, राष्ट्रवादी समाजवादी पक्ष १३ जागांवर तर इतर पक्ष २९ जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेसाठी ७३१ जागा आणि पंचायत समित्यांसाठी १,४६२ जागांसाठी मतदान झाले. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकूण २,६२४ उमेदवार, तर पंचायत समिती निवडणुकांसाठी ४,८१४ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकांचे निकाल राज्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.