महाराष्ट्र

धैर्यशील मोहितेंनी तुतारी फुंकली; शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात केला प्रवेश

Swapnil S

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रविवारी सायंकाळी अखेर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला खुद्द विजयसिंह मोहिते-पाटील तसेच स्थानिक नेते उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते. त्याच नाराजीतून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रविवारी सायंकाळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पक्षबदलाचा परिणाम केवळ माढ्यावरच नाही, तर आजूबाजूच्या मतदारसंघातही होण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र, आता मोहिते-पाटील विरोधात गेल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली आहे. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळविला होता. आता दहा वर्षांनी मोहिते-पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते निवडणुकीत उतरल्याने २०१४ ची पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता आहे.

अकलूजमध्ये तीन मित्र आले एकत्र

तत्पूर्वी, अकलूज येथे मोहिते-पाटील यांच्या ‘शिवरत्न’ निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या मित्रांची रविवारी भेट झाली. विजयदादा यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते. भाजपमध्ये गेलेले मोहिते-पाटील कुटुंबीय पुन्हा शरद पवारांच्या जवळ आल्याने पवार आणि शिंदे यांचे स्वागत करताना विजयदादा भावुक झाले होते. पवार आणि शिंदे यांनी विजयदादांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी तिन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त