महाराष्ट्र

५० खोके कमी पडतायेत म्हणून बोके मुंबई आणि धारावी गिळायला निघाले, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाही

Swapnil S

"५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत,” अशा शब्दांत शिवसेनेचे (उ.बा.ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानी आणि राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ते धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प अदानी समुहाकडे दिल्याच्या विरोधात काढलेल्या महामोर्चाला संबोधित करीत होते. पुनर्विकास प्रकल्पात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या TDR अनियमिततेचा समावेश आहे, जो "जगातील सर्वात मोठा घोटाळा" आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील सरकार अदानींच्या दारी आहे. धारावीतील सर्व गोष्टींचा टीडीआर अदानींना देऊन टाकला आहे. यांना जर वाटत असेल, की 'सब भूमी गोपाल की', तशी 'सब भूमी अदानी की', तर असे अजिबात होऊ देणार नाही. आता तुमच्या लक्षात आले असेल की, अडीच वर्षे यशस्वीपणे चालणारे सरकार, गद्दारी करून यांनी पाडले, ते खोके कुणी पुरवले असतील? आता तुम्हाला लक्षात आले असेल, खोके कुणाकडून गेले असतील? विमान कुणी पुरवले असेल? हॉटेल बुकिंग कुणी केले असतील? मुळात सरकार पाडण्याचे कारण आता तुम्हाला कळले असेल. उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत तोपर्यंत मुंबई गिळता येणार हे लक्षात आल्यानं सरकार पाडलं की काय असं वाटू लागलंय. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

हे देवेंद्र फडणवीसांचे पाप

आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, पण धारावीचा गळा घोटू असा एकही निर्णय घेतला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 2018 साली धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे हे पाप देवेंद्र फडणवीसांचे आहे, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

“घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. जिथल्या तिथं घर हवं. पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायासाठी जागा द्या, कोळीवाडा-कुंभारवाड्यांचं सीमांकन द्या. लोणची पापड सारख्या व्यवसायाला खुल्या जागा द्या, अशी मागणी करतानाच या सरकारमध्ये निवडणूक घेण्याची धमक नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिले, त्यावेळी 105 मराठी माणसांनी रक्त सांडलं. ही आम्ही कमावलेली मुंबई आहे, त्याला हात लावाल तर याद राखा असा इशाराही त्यांनी दिला.

या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह, अनेक धारावीकर, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?