देवेंद्र फडणवीस भाजपचे गटनेते म्हणून जाहीर झाल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईपर्यंत सस्पेन्स कायम होता. मात्र, गुरुवारी दुपारनंतर भाजपचे नेते गिरीश महाजन ‘वर्षा’ बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. गिरीश महाजन आणि शिंदे यांच्यातील चर्चेनंतर अखेर गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
गेले काही दिवस एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या. आधी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेले एकनाथ शिंदे यांनी नंतर माघार घेत भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला होता, पण त्यानंतर ते गृहमंत्रीपदावर अडून बसले होते.
नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीपासून शपथविधी सोहळ्याच्या दिवसापर्यंत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. परंतु, भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी गुरुवारी ‘वर्षा’ बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. तसेच शिवसेना आमदारांनी केलेल्या मनधरणीनंतर अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले. शिवसेना नेते उदय सामंत यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले.
शिंदेंच्या होकारानंतर सामंत-फडणवीस भेट
शिवसेना नेते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांच्या भावना शिंदे यांना सांगितल्या. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील तर शिवसेनेचा कोणताही मंत्री शपथ घेणार नाही, अशा भावना आमदारांनी व्यक्त केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाले. त्यानंतर उदय सामंत हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘सागर’ बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करत शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.
विरोधी पक्षातील नेते अनुपस्थित
महायुतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील कुणीही नेता उपस्थित नसल्याने सरकार व विरोधकांमध्ये यापुढेही संघर्ष कायम राहणार असल्याचे चित्र दिसून आले. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले यांना या सोहळ्याचे निमंत्रण असूनही ते अनुपस्थित होते.