अखेर ओंकारचे आईसोबत पुन्हा पुनर्मिलन; वनतारा पुनर्वसन योजनेबाबत वनविभागाचे पाऊल मागे 
महाराष्ट्र

अखेर ओंकारचे आईसोबत पुन्हा पुनर्मिलन; वनतारा पुनर्वसन योजनेबाबत वनविभागाचे पाऊल मागे

कोकणातील बहुचर्चित आणि अडचणीत सापडलेला हत्ती ओंकार याचे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेढे धरण परिसरात आईसोबत नैसर्गिकरित्या पुनर्मिलन झाले. 'रानटी वर्तन' माणसांवर हल्ले आणि पिकांची नासधूस या कारणांमुळे ओंकारला महाराष्ट्राबाहेर हलवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र या पुनर्मिलनामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चिंतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

राजकुमार भगत

उरण : कोकणातील बहुचर्चित आणि अडचणीत सापडलेला हत्ती ओंकार याचे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेढे धरण परिसरात आईसोबत नैसर्गिकरित्या पुनर्मिलन झाले. 'रानटी वर्तन' माणसांवर हल्ले आणि पिकांची नासधूस या कारणांमुळे ओंकारला महाराष्ट्राबाहेर हलवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र या पुनर्मिलनामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चिंतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हे पुनर्मिलन अनेक आठवड्यांच्या सतत निरीक्षणानंतर पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने घडले. 'ही प्रक्रिया संपूर्णतः नैसर्गिक होती,' असे सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराडे यांनी सांगितले.

'आम्ही केवळ हत्तींच्या हालचालींचे निरीक्षण केले आणि कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ दिला नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. वनविभागाने ओंकारला गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्याचा विचार सुरू करताच, नॅटकनेक्ट फाऊंडेशनने हा मुद्दा पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला होता. हत्तीला हलवण्याची प्रक्रिया थांबवून, कळप जवळ असल्यास नैसर्गिक पुनर्मिलनाची शक्यता तपासावी, अशी मागणी करण्यात आली होती. प्रस्तावित स्थलांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. प्रकरणाची पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.दरम्यान, ओंकारच्या हालचालींचा मागोवा घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या क्षेत्रीय अहवालांनी प्रकरणाची दिशा बदलली.

ओंकारची आई गौरी आणि आणखी चार हत्ती त्याच वनक्षेत्रात ओंकारच्या शेवटच्या ठिकाणापासून अवघ्या १५ ते २० किलोमीटर अंतरावर फिरताना दिसल्याची माहिती मिळाली. वनविभागाने सुरक्षित अंतर राखत परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि नैसर्गिक प्रवृत्तीला वाव दिला. कोणतेही भूल इंजेक्शन, पिंजरे किंवा मानवी हस्तक्षेप न करता आई आणि पिल्लू पुन्हा एकत्र आले. ओंकारचा अधिवास कमी होणे यामुळे निर्माण झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रतीक बनला होता, असे कुमार म्हणाले. कधी कधी संघर्ष आणि सहअस्तित्व यांमधील अंतर फक्त एका सोंडेएवढेच असते,असेही त्यांनी नमूद केले.

हत्ती हे अत्यंत सामाजिक प्राणी आहेत. आई आणि कळपापासून कायमची ताटातूट झाल्यास दीर्घकालीन मानसिक ताण आणि अनपेक्षित वर्तन दिसून येऊ शकते. ओंकारला त्याच्या परिसरातून दूर नेल्यास परिस्थिती अधिकच बिघडली असती.
बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाऊंडेशन
जरी अनेक गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले असले, तरीही अनेक स्थानिक रहिवाशांनी स्थलांतराच्या योजनेला विरोध केला होता. पकड मोहीम किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय शोकांतिकेत बदलू शकतात, अशी त्यांची भीती होती. 'लोक ओंकारच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होते. हत्तीमुळे नव्हे, तर घबराटीमुळेच एखादी दुर्घटना घडेल, अशी भीती लोकांना वाटत होती.
मंदार गावडे, अभ्यासक वन्यजीव

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल