दुसऱ्यांना जरब बसेल अशी खरातवर कारवाई; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली ग्वाही 
महाराष्ट्र

दुसऱ्यांना जरब बसेल अशी खरातवर कारवाई; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली ग्वाही

‘दुसऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई भोंदू अशोक खरातवर केली जाईल’, अशी ग्वाहीसुद्धा फडणवीस यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : जादुटोणा करून समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचा सल्लागारच नेमला असता. मग आपण युद्ध ड्रोनऐवजी लिंबू - मिरचीने लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण इथे बसून टाचणीने संपवले असते. सीमेवर सैनिकांऐवजी पाच-दहा भोंदूबाबांना पाठवले असते आणि आपली सीमा सुरक्षित झाली असती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसूनच सगळ्या निवडणुका जिंकता आल्या असत्या’, अशी तुफान टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. त्याचबरोबर ‘दुसऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई भोंदू अशोक खरातवर केली जाईल’, अशी ग्वाहीसुद्धा फडणवीस यांनी यावेळी दिली.

हरवलेला विवेक

विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे वर्णन ‘अंधश्रद्धेत हरवलेला विवेक’ अशा शब्दात केले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात खूप छोटी रेषा आहे. ही रेषा भंगते तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते, हे आपण पाहिले आहे. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. या संतांनी देवाचे अस्तित्व कुठेही नाकारलेले नाही. पण अंधश्रद्धेवर प्रहार केला. सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कुणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा. ज्यात दुसऱ्याचे अहित होते ती कधीच श्रद्धा असू शकत नाही’, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरस कथा समोर येतील...

मुळात खरात हा ‘कॅप्टन’ नाही हे आता उघडकीस आले आहे. मी मंगळवारी याबाबत निवेदन केले असून त्यानंतरही खूप माहिती समोर येत आहे. त्याची मालमत्ता, वेगवेगळे कांड उघडकीस येत आहेत. खरातची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याच्या सुरस आणि चमत्कारीक कथा समोर येत राहतील, असे सांगत फडणवीस यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. या नियमांना विधि आणि न्याय विभागाने मान्यता दिली आहे. या प्रकरणात या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पाळेमुळे खणून जबर शिक्षा देणार...

‘विकृत खरात प्रकरणी ज्यांच्याकडे माहिती असेल ती त्यांनी सरकारकडे द्यावी, असे आवाहन करताना फडणवीस यांनी खरातची पाळेमुळे खणून काढून त्याला जबर शिक्षा देण्याचे सूतोवाच केले. या प्रकरणाने आपण कुठे जात आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आत्मविश्वास असावा पण अतिआत्मविश्वास नसावा’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड