महाराष्ट्र

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा; रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलिसांचे विद्यार्थ्यांना आवाहन

वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवताना अडवल्यास वाहतूक पोलिसांशी वाद न घालता वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन अंबरनाथ वाहतूक पोलीस उपविभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी केले.

Swapnil S

बदलापूर: वाहतुकीचे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवताना अडवल्यास वाहतूक पोलिसांशी वाद न घालता वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन अंबरनाथ वाहतूक पोलीस उपविभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी केले.

३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत, बदलापुरातील कै. द्वा. ग. नाईक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्काथी व पालकांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी हे आवाहन केले. सध्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणे, फोन कानाला लावून संवाद साधत गाडी चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे या प्रमुख चार कारणांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात टाळावे व नियम पाळावे यासाठी, वाहतूक विभागाच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान देशभर राबवले जात असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.

अनेक वाहन चालक वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यात कर्तव्यावर असताना वाहतूक पोलिसांनी अशी वाहने अडवल्यास वाहन चालक या ना त्या कारणांवरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. परंतु हे नियम तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यकच असल्याचे आजगावकर म्हणाले. या कार्यक्रमात वाहतूक विभागाच्या वतीने विद्यार्थी व पालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी, शाळेचे शिक्षकवृंद, आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी डोक्यावर हेल्मेट घालून वाहतूक पोलिसांच्या समवेत शाळेपासून, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरपर्यंत बाईक रॅली काढली. दुचाकीस्वारांनी सक्तीने हेल्मेटचा वापर करून अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करून वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथही घेतली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प