पेण/अलिबाग/पोलादपूर : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या संयमाची परीक्षा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी घेत असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
वाहतूककोंडीत अडकल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईहून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता निघालेले भाविक शनिवारी २ वाजता मालवणला पोहचले आहेत. जवळपास २० ते २२ तासांचा कंटाळवाणा प्रवास भाविकांना करावा लागत आहे. येत्या सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी लाखो कोकणवासीय मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबईतून बाहेर पडण्यासाठीच चाकरमान्यांना ५ ते ६ तास लागत आहेत. लाखो प्रवासी वाहने रस्त्यावर आल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण आला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. महाडच्या दिशेकडे दोन ते तीन माग्र्गिकने वाहने पुढे सरकत आहेत. माणगाव परिसरातील वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे दिसत आहेत. वाहने या वाहतूक कोंडीत अडकली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका कोकणवासीयांना तसेच इतर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना प्रवासात मोठा विलंब सहन करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना तासनतास गाड्यांमध्ये बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या संयमाची परीक्षाच पाहिली जात आहे.
पेट्रोल पंपावर रांगा
गावाकडे जाताना इंधन भरण्यासाठी वाहनचालक मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर थांबत आहेत. त्यामुळे अनेक पंपांच्या प्रवेशद्वारापासूनच वाहनांच्या रांगा दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलसोबत सीएनजी वाहनांची संख्याही वाढल्याने काही ठिकाणी इंधन भरण्यासाठी वाहनचालकांना प्रतीक्षेत राहावे लागत आहे.
नागोठणे आणि कोलाड येथील फ्लायओव्हरवरील रस्त्याची कामे अर्धवट राहिल्याने तसेच इंदापूर येथील बायपास, माणगाव येथील बायपास ही कामे अर्धवट असल्याने जुन्या दुपदरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहने वाढून वाहतूक कोंडी उद्भवण्याची परिस्थिती निर्माण झाली. नागोठणे पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे उघड झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने नागोठणे पुलाच्या कामाचे डोहाळे जेवण देखील घातले. मात्र, शुक्रवारी दुपारपासून गणेश भक्त खाजगी वाहनाने कोकणाकडे रवाना होऊ लागल्यामुळे महामार्गावर जाणवू लागलेली वाहनांची गर्दी शनिवारी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
जिल्हा पोलीस प्रशासनाने आणि वाहतूक विभागाने वाकण ते पाली कांदळगाव, निजामपूर, माणगाव तसेच ढालघर फाटा, माणगाव बायपास आणि रायगड रोडमार्गे महाड असा पर्यायी रस्ता सुचवला. मात्र, शुक्रवारी व शनिवारी या पर्यायी रस्त्यावरून वाहनांची तुरळक वाहतूक झाली. प्रत्यक्षात, शनिवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंत मुंबई व ठाणे महापालिका व उपनगरांमधील कोकणवासीयांना उपलब्ध करण्यात आलेली एसटी बसेस व लालपरीसारखी वाहने मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने येणार असल्याने या पर्यायी रस्त्यांचा वापर होण्यासाठी वाहतूक पोलिसांना वाहने वळवावी लागणार आहेत.
आज होणार परीक्षा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील गणेशभक्तांचा प्रवास गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वेगाने होत असल्याचे जाणवत आहे. शनिवारी रात्रीपासून हजारो वाहनातून चाकरमानी कोकणाकडे रवाना होणार असल्याने रविवारी महामार्गाच्या क्षमतेची परीक्षा घेतली जाईल.