सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या घोटगे-सोनवडे घाटमार्गाला अखेर केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी घाटमार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. नीलेश राणे यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी या घाटमार्गाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल आमदार डॉ. राणे यांनी त्यांचे आभार मानले.
या मार्गामुळे परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल. घाटमार्ग पूर्ण करण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलून प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे डॉ. राणे यांनी सांगितले. घोटगे-सोनवडे घाटमार्गामुळे कुडाळ ते कोल्हापूरचे अंतर तब्बल ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे कुडाळहून कोल्हापूरला सुमारे दीड ते दोन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक गावे मुख्य विकासप्रवाहात जोडली जाणार असून, या मार्गामुळे कुडाळ, मालवण, वेंगुर्ले आणि कणकवली तालुक्यांतील अनेक गावांना कोल्हापूरशी थेट आणि जलद संपर्क मिळणार आहे.
भुदरगड (कोल्हापूर) ते कुडाळ (सिंधुदुर्ग) हा मार्ग ब्रिटिश काळापासून पाऊलवाट म्हणून अस्तित्वात होता. २०२५ मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले आणि मार्ग निश्चित करण्यात आला. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये आमदार डॉ. नीलेश राणे यांनी दिल्लीत पर्यावरण विभागात प्रलंबित असलेल्या प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी हालचाली सुरू केल्या.
१९८५ पासूनचा प्रश्न मार्गी
सिंधुदुर्ग-कोल्हापूर जोडणाऱ्या या घाटमार्गाचा प्रश्न १९८५ पासून प्रलंबित आहे. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य कै. महेंद्र नाटेकर यांची या घाटमार्गाची मूळ संकल्पना होती. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली घोटगे, सोनवडे आणि परिसरातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलने, उपोषणे, धरणे तसेच मोर्चे काढले. मात्र, पर्यावरणीय मंजुरीच्या प्रक्रियेमुळे हा प्रकल्प दिल्लीतील पर्यावरण विभागात अनेक वर्षे रखडला होता. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले असून प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे.
स्थानिक विकासाला मोठी चालना
सोनवडे (कुडाळ) ते शिवडाव (कोल्हापूर) या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या नव्या घाटमार्गाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाली असून, त्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभर या घाटमार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्याच्या दृष्टीने त्याची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील दळणवळणासह पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.