पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला पुन्हा निवडून दिल्यास ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’ची रक्कम १५०० रुपयांवरून हळूहळू वाढवत ३ हजार रुपयांपर्यंत नेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या योजनेत तुम्हाला आता १५०० रुपये मिळत आहे. येत्या निवडणुकीत आम्हाला आशीर्वाद दिल्यास त्यानंतर तुम्हाला १७५० रुपये, त्यानंतर २ हजार रुपये, नंतर ३ हजार रुपये दरमहा देऊ, असे आश्वासन तुम्हाला देतो.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या योजनेवरती विरोधक म्हणाले लाडक्या भावाचं काय? यांना कधी तरी लाडक्या भावावर प्रेम होतं का? असतं तर ते सोडून गेले असते का? पण आम्ही लाडक्या भावांनाही शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली आहे. महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सावत्र कपटी भावांवर मात करून आलो आहे. फक्त त्यांना लक्षात ठेवा. त्यांना योग्यवेळी जागा दाखवा. भीक देता का, विकत घेता का, लाच घेता का, असे शब्द काढायला लागले. या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. ते या योजनेच्या विरोधात कोर्टातही गेले. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि बहिणींच्या बाजूने निकाल दिला. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजारांचे महत्त्व कळणार आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.
आज मोठ्या मैदानात लाखो बहिणींना बोलावून हा सोहळा करायचा होता. पण, स्टेडियममध्ये घेतला. चार मोठे हॉल आहेत. त्यात लाडक्या बहिणी बसल्या आहेत. हा कार्यक्रम लाइव्ह दिसत आहे. कॅबिनेटमध्ये मी म्हटले होते की, रक्षाबंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजेत. अजित पवार, फडणवीस यांनी तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या, असे सांगितले. या योजनेमुळे अनेकांना पोटदुखी, कावीळ, डोकेदुखी असे विकार जडले आहेत. विरोधकांनी आता झंडू बाम लावला, तरी त्यांचा हा आजार जाणार नाही. कारण, एवढा कठीण आजार जडला आहे. विरोधक म्हणतात, १५०० रुपयांत काय होणार आहे? परंतु, गरिबीचे चटके काय असतात, हे त्यांना कसे कळणार? १५०० रुपयांचे मोल काय आहे, हे माझ्या लाडक्या बहिणींना चांगले माहिती आहे. त्यामुळे १५०० रुपयांचे मोल अधिक आहे, असे ते म्हणाले.
हे देना बँकवाले सरकार : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद होण्यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. पण, सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीबीटी प्रणाली आणल्याने योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. आता दलालांचे दुकान बंद झाले आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात पैसे आल्याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हे सरकार ‘लेना बँक'वाले नव्हे, तर ‘देना बँक'वाले सरकार आहे. मागचे सरकार हे वसुली करणारे होते. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर सावत्र भाऊंच्या पोटात दुखायला लागले. ऑनलाईन पोर्टलमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. पोर्टल बंद झाल्यावर टीका सुरू झाली. परंतु, विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आमच्या सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली.
आम्ही तुम्हाला ९० हजार देऊ - अजित पवार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुढील काळातदेखील सुरू राहणार आहे. आम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ता दिल्यास येत्या पाच वर्षांत ९० हजार रुपये बहिणींना देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विरोधकांच्या अपप्रचाराला मायमाऊलींनी बळी पडू नये. आत्ताचे सरकार हे सातत्य ठेवणारे आहे. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहील. परंतु, त्याकरिता तुमची साथ हवी आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीत कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवा, अशी सादही त्यांनी घातली.
सावत्र भावांना जोडा दाखवा
मी संघर्ष करत पुढे आलो असून, राज्यातील बहीण, भावांची आपल्याला काळजी आहे. त्यामुळेच आम्ही ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. मात्र, सावत्र भाऊ त्यालाही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असून, त्यांची गाठ आता माझ्याशी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरोधकांना दिला.