मुंबई : कर्जत भिमाशंकर भागात होणारा टोरंटचा प्रकल्प हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करणारा आहे. विकासाला कोणाचाही विरोध नाही, पण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून कसला विकास करणार आहोत.
हा प्रकल्प केवळ उद्योगपतीचे चांगभलं करणारा असून हजारो झाडे दुसरीकडे लावण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हास्यास्पद आहे, असा विनोद राज्याला परडवणारा नसून महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव हल्ली फारच विनोदी झाला आहे, सह्याद्रीच्या भागात लाखो झाडे लावण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असतानाच राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता, ही वृक्ष लागवड कुठे केली, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, सपकाळ गुरुवारी भिमाशंकर अभयारण्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीची पाहणी करून स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.